Header Ads Widget

शंकर नागले गुरुजी : विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व

 



शंकर नागले गुरुजी : विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व

माननीय शंकर नागले गुरुजी आपल्यात नसल्याची खंत कायम राहील. काही माणसे सदैव आपल्यासोबत असावीत असे वाटणाऱ्यांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे नागले गुरुजी. शिक्षक म्हणून ते उत्कृष्ट होतेच,  पण माणूस म्हणूनही ते तितकेच चांगले होते. शिक्षक आणि शिक्षकातला माणूस म्हणून त्यांच्या काही आठवणी जपलेल्या आहेतच.

शिस्तप्रिय शिक्षक, अभ्यासू, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि एका शिक्षकाला जे गुण अंगी असावे लागतात ते सर्व त्यांच्याकडे होते. त्यांचा  आणखी एक गुण म्हणजे स्पष्ट बोलणे, आवाजात जरब असणे.

अशा या नागले गुरुजींचा सहवास शिक्षण म्हणून, शिक्षक म्हणून एकच वर्ष लाभला. मात्र त्यांचे मार्गदर्शन जीवनभर उपयुक्त ठरणारे आहे. अनेकांना वाटेल एका वर्षात नागले गुरुजी आणि माझे ऋणानुबंध कसे काय जमले  गेले असतील? हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी माझे आणि नागले गुरुजी यांचे, त्यांच्या कुटुंबीयांचे ऋणानुबंध कायमचे जपले गेले.

मी चौथीमध्ये होतो. माझी शाळा म्हणजे रुंढेतळी. गावातच शाळा. एकदा आईवडिलांनी पोरांना मास्तरांच्या हवाली केले की आईवडिलांची जबाबदारी संपायची आणि शिक्षकांची सुरू व्हायची. तो काळच तसा होता. आणि शिक्षकही आपली जबाबदारी आहे असे समजूनच शिकवायचे. आमचे अनेकांचे आईबाबा असे असतील की एकदा शाळेत घातल्यानंतर पोराची दहावी झाली तरी शाळेत फिरकलेले नाहीत. कारण त्यांचा शिक्षकांवर असलेला प्रचंड विश्वास. याच आणि अशा विश्वासाच्या कसोटीवर नागले गुरुजी उतरले होते.

हा तर मी चौथीत असताना आजारी होतो. गोवर आले होते. चौथीचे दोन पेपर राहून गेले होते. त्यावेळी शाळेवर कोंडसर बुद्रुक येथील परांजपे गुरुजी शिक्षक म्हणून होते. अनेकांनी विनवण्या केल्यानंतरही त्यांनी पुन्हा पेपर घेतले  नाहीत. परिणामी माझी चौथीत वारी झाली आणि परांजपे गुरुजी यांची बदली झाली. त्यानंतर नागले गुरुजी आमच्या शाळेत रुजू झाले.

नागले गुरुजी हे कडक शिस्तीचे. वेळेवर अभ्यास पूर्ण असावा हा दंडक. मग गणित असो की इतिहास. ते सर्व विषय चांगल्या पद्धतीने शिकवायचे. ते गणित इतक्या सोप्या आणि चांगल्या पद्धतीने शिकवायचे की ते विसरता यायचे नाही. मात्र चूक झाल्यास शिक्षा करण्याची त्यांची पद्धत कडक होती. हात लाल होईपर्यंत फूटपट्टी आणि छडीने मार पडायचा. अनेकदा मी त्यांचा मार खाल्ला आहे. नागले गुरुजी शाळेत आले आणि शाळेलाही शिस्त लागली. अनेकदा आम्ही विद्यार्थी शाळा सारवायचे काम करायचो. शेण आणि पाणी आणून द्यायचे काम मुलांकडे असायचे. शाळा स्वच्छ आणि साफ राहायला हवी असा त्यांचा कटाक्ष असायचा. ते मला फक्त चौथीतच शिकवायला होते. पाचवीपासूनचे शिक्षण हे आडिवरे हायस्कूलमध्ये होते.

नागले गुरुजी आणि माझ्यात जवळीक वाढायला आणखी एक गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे माझ्या आईचे निधन. मी सातवीत असताना माझी आई गेली. त्यावेळी हेच नागले गुरुजी घरी आले आणि त्यांनी मला मांडीवर घेतले होते. शिक्षकांच्या मांडीवर बसायचा तो पहिला प्रसंग...

त्यानंतर ते नेहमी माझी चौकशी करायचे. त्यावेळी ते बऱ्याचदा बंड्या शेडेकरचा भाचा असा उल्लेख करायचे. बंड्या शेडेकर (रामचंद्र शेडेकर) हे माझ्या मामांचे नाव. मामांना आणि मामांच्या आईला (आजीला) ते जवळून ओळखायचे. आईनंतर माझे शिक्षण मामांच्या घरी अर्थात शेडेकरवाडी येथे झाले.

मी मुंबईहून गावी गेलो की मामांची आई म्हणायची, "बाबू, तिट्यावरचो मास्तर भेटलो की तुझ इचारीत असता, आलस हस तर भेटून ये जा." मग वेळ काढून मी त्यांना भेटून यायचो. खूप गप्पाटप्पा होत. गुरुजींचा पत्नी तितक्याच प्रेमळ. त्याही तेवढ्याच ममतेने चौकशी करायच्या. त्यांचे सुहास आणि सुनील हे दोन्ही मुलगे आजही भेटले तरी हाक मारतात. गुरुजींच्या गप्पा सुरू झाल्या की शेडेकरवाडी, तळीवाडी येथील लोकांच्या नावानिशी गप्पा सुरू होत असत. कधी तरी शिक्षणावर... बराच वेळ निघून जायचा. त्यांच्या घरातून निघताना त्यांचे पाय धरले की ते माझ्या डोक्यावर हात ठेवायचे आणि म्हणायचे, "जन्मावर म्हातारा हो"... खूप भरून यायचे आणि धन्य वाटायचे.

मी गणपतीला गावी गेलो की गुरुजींच्या घरी आवर्जून जात असे. वयोमानुसार त्यांची तब्येत बरी नसायची. पण मी ज्या वर्षी गणपतीला गावी गेलो नाही की पुढच्या वर्षी ते नक्की विचारायचे, "गेल्या वर्षी गणपतीला गावी आला  नव्हतास का?" कारण त्या वर्षी मी गावी गेलेलो नसायचो.

यंदाही काही कारणास्तव गणपतीच मुंबईला घेऊन आलो. गावी जाता आले नाही... कदाचित गावी गेलो असतो तर गुरुजींची भेट नक्कीच झाली असती... पण मी पुन्हा केव्हा गणपतीला गावी जाईन तेव्हा "गेल्या वर्षी गणपतीला गावी आला नव्हतास ना" असे विचारणारे माझे गुरुजी मात्र नसतील....... याची खंत नक्कीच बोचत राहील... 


banner

Post a Comment

0 Comments