Header Ads Widget

GURU PAOURNIMA _ गुरुपौर्णिमा : विद्यार्थी घडवणाऱ्या गुरुवर्यांना वंदन


गुरुपौर्णिमा : विद्यार्थी घडवणाऱ्या गुरुवर्यांना वंदन

श्री महाकाली इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ विद्यालय नवेदर आडिवरे 

(सन १९८८ ते १९९६ पर्यंत)

राजापूर तालुक्यातील श्री महाकाली इंग्लिश स्कूल हे तसं नामांकित. शाळेतील शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रती आणि शाळेप्रती असलेली निष्ठा, विद्यार्थ्यांना समजेपर्यंत जीव ओतून शिकवण्याची तळमळ, तगमग  हे या शाळेचे यश. आज गुरुपौर्णिमा आहे. या शाळेतील शिक्षकांबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतील. त्यामुळे ज्या ज्या शिक्षकांच्या ज्ञानाचा परिसस्पर्श लाभला त्या त्या शिक्षकांबद्दल... 

शाळा कोणतीही असो  हेडमास्तर अर्थात मुख्याध्यापक हा त्या शाळेचा कणा असतो. ज्या काळखंडाचा उल्लेख केला आहे त्या वेळी श्री. चव्हाण सर हे श्री महाकाली इंग्लीश स्कूलचे मुख्याध्यापक होते. शिकवण आणि शिस्त याचं उत्तोमातलं उत्तम उदाहरण म्हणजे चव्हाण सर. जीवशास्त्र हा विषय शिकवताना ते त्यात एवढा जीव लावायचे की या अवघड विषयात कुणी नापास झाला असेल असं आठवत नाही. जीवशास्त्रात ते जीवच ओतायचे. त्यांनी शाळा ज्या प्रकारे सांभाळली त्याला तोडच नाही. श्री. चव्हाण सरांसारखे मुख्याध्यापक लाभणे म्हणजे भाग्यातलं भाग्य. आडिवरे हायस्कूलला कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात चव्हाण सरांनी जी मेहनत घेतली त्याचं फळ आज अनेक विद्यार्थी घेत आहेत. त्यामुळे आडिवरे हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजसाठी त्यांनी केलेल्या कार्याला सॅल्यूटच.

आम्ही ज्या वेळी शाळेत होतो तेव्हा श्री. शेवडे सर हे उपमुख्याध्यापक होते. मात्र त्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हायची ती सहावीपासूनच. त्याचं सर्वच विषयावर कमालीचं प्रभुत्व. सहावीमध्ये ते इंग्रजी शिकवायचे. त्यांनी शिकवलेली संडे मंडे या  कवितेच्या काही ओळी आजही आठवतात. कॅप सेलर आणि मंकी ही कथा तुम्ही कधीच विसरणार नाही. तर सिंड्रेला धडा त्याच तन्मयतेने त्यांनी शिकवला. त्यावेळी इंग्रजी डोक्याच्या वरून वीतभर तरी जात असे. पण ते ज्या प्रकारे शिकवायचे ते अफलातून होते. दहावीला ते इतिहास हा विषय इतक्या तन्मयतेने शिकवायचे की त्यांना ऐकतच राहावं. मग ते पहिले महायुद्ध की दुसरे महायुद्ध. पुस्तक न घेता अचूक इतिहास त्यांनीच शिकवावा. 

आडिवरे हायस्कूलला बीजगणित शिकवणारे सर म्हणजे श्री. देसाई सर. बीजगणितातले बादशाह. दहावीच्या विद्यार्थ्यांना ते बीजगणित आणि भूमिती शिकवायचे. समीकरणं कशी सोडवायची, त्याच्या पद्धती काय हे विद्यार्थ्यांना समजेपर्यंत ते सांगायचे. बाकोबा, कोबाको हे शब्द तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या चांगलेच पचणी पाडले होते.  जितक्या तन्मयेतेने ते बीजगणित, भूमिती शिकवायचे तेवढ्याच तन्मयतेने देसाई सर भूगोलही शिकवयाचे. 

इंग्रजी विषय म्हटला की आधीच अवघड वाटायचा. त्यात आधीच्या विद्यार्थ्यांनी श्री. पुंडपाळ सरांच्या कडक शिस्तीबद्दल सांगून ठेवलेले असायचे. पुंडपाळ सर असे एकमेव शिक्षक होते की ते वर्गात यायच्या आधी इंग्रजीचे पुस्तक आणि वही बँचवर काढून विद्यार्थी तयार असतं. पुंडपाळ सरांनी आठवी ते दहावी आणि नंतर ज्यूनिअर कॉलेज झाले तेव्हा बारावीपर्यंतची इंग्रजी शिकवण्याची धुरा सांभाळली. माझा विद्यार्थी घडला पाहिजे हीच त्यांची तळमळ. त्यांची इंग्रजी शिकवण्याची पद्धत आणि इंग्रजीवरील प्रभुत्व वादातीत. 

श्री. भट सर म्हणजे मराठी आणि मराठी म्हणजे भट सर असं समीकरण होतं. आठवीपासून ते बारावीपर्यंत त्यांनी मराठी शिकवली. मराठी अप्रतिमपणे शिकवणं हे त्यांचं वैशिष्ट्य. कविता शिकवताना तर ते तल्लीन व्हायचे. प्रेमाचा गुलकंद ही कविता त्यांनी ज्या प्रकारे शिकवली तिला तोड नाही. मराठीतले अनेक धडे ते इतके मग्न होऊन शिकवायचे की प्रश्नांची उत्तर पाठ करण्याची वेगळी गरज भासायची नाही. ते संस्कृतही तेवढ्याच तन्मयतेने शिकवायचे. भूगोल विषयावरही त्यांची तेवढीच पकड होती. 

बीजगणित आणि जीवशास्त्र विषय शिकवणारे अजून एक शिक्षक म्हणजे श्री. दबडे सर. कोणतंही गणित असो ते फळ्यावर सोडवल्यानंतर विद्यार्थ्यांना कळलंच पाहिजे. नाही कळलं तर तेच गणित पुन्हा शिकवत. विद्यार्थ्यांना आपण शिकवलेलं समजावं ही त्यामागची तळमळ. जीवशास्त्रही त्याच तळमळीने ते शिकवायचे. विद्यार्थ्यांशी आपुलकीने बोलणे, त्यांना समजावून घेणे हे त्यांचे गुण सर्वांना आवडायचे.   

श्री. हजारे सर म्हटले की आठवतो तो पीटीचा तास. पीटी हा विषय तसा सर्वांच्या आवडीचा. कारण काही ठराविक विद्यार्थी-विद्यार्थिनी सोडल्या तर बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी तो ऑफ तास असायचा. खो-खो, कबड्डी, धावणे, भालाफेक, गोळाफेक कशी करावी हे सर्व हजारे सर समजावून सांगायचे. हजारे सर आणि खो खो, कबड्डी खेळताना शिस्त मोडली की काठीने शिस्त शिकवायचे. शिट्टी वाजली की समजावं सर मैदानात आले. हजारे सर इतिहास हा विषयही उत्तम शिकवायचे, मात्र ते जास्त खुळायचे ते मैदानावरच.

रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र हे विषय तसे अवघड. मात्र आठवीपासून ते दहावीपर्यंत या विषयांची धुरा सांभाळली होती ती श्री. भिडे सरांनी. भिडे सरांचा तास असला की मुलं प्रचंड रिलॅक्स असायची. ते ज्या वर्गात शिकवत तो वर्ग सर्वांच्या लक्षात यायचा. कारण मनसोक्तपणा. भिडे सरांनी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र मनसोक्तपणे शिकवलं. रसायनशास्त्रातील संयुगे हा विषय भारी शिकवायचे. धूर आला की वर जातो, म्हणेज बाणाचे टोक कुठे तर वरच्या बाजूला...हे असे भारी शिकवणे होते. ते संस्कृतही तितक्यात उत्तमपणे शिकवयाचे. अजूनही 'नलिकागतमपि कुटिलं न भवति सरलं शुनः पृच्छम् । तद्वत् खलजनहृदयं बोधितमपि नैव याति माधुर्यम् ॥ हे सुभाषित आजही आठवतं. हे भिडे सरांचं यश. 

श्री. साखरकर सरांचा सहवास काही महिन्यांसाठी लाभला. कारण ते मी आठवीत आल्यानंतर निवृत्त झाले. मात्र काही महिने का होईनात त्यांनी मराठी आणि संस्कृत शिकवलं ते भारीच होतं. श्री. साखरकर सर विषयात समरस होऊन शिकवायचे आणि विशेष म्हणजे उदाहरण देताना आपल्याच आजूबाजूची देत असल्यामुळे विषयही सोपा वाटायचे. त्यांनी त्यांचं सांगितलेलं एक उदाहरण अजूनही चांगलं आठवतं. ते शेतात काम करत असताना बोटाला सापाने दंश केला होता. बहुधा ती करंगळी असावी. सरांनी ती करंगळी जिथे दंश केला तिथेचं कोयत्याने कापली होती. हे त्यांच्या धाडसाचं उदाहरणं.

हिंदी शिकवावी ती श्री. गुणे सरांनी. आठवी ते दहावी आणि नंतर बारावीपर्यंत त्यांनी हिंदीची जबाबदारी पेलवली होती. गुणे सरांचं हिंदी शिकवणं फारच छान असायचं. एका किशात हात आणि दुसऱ्या हातात पुस्तक. एक एक परिच्छेद शिकवताना ते पहिल्यांदा वाचायला सांगायचे. एका विद्यार्थ्याने एक परिच्छेद वाचला की त्याचं सविस्तर स्पष्टीकरण ते द्यायचे. त्यांच्या हिंदी विषयात कुणीही नापास होत नसे. त्याचं एकमेव कारण असंही होतं  की, धडा शिकवून झाला की कोणत्या प्रश्नचं उत्तर कुठून सुरू होतं आणि ते कुठे संपतं हे तेच सांगायचे. आम्ही फक्त पुस्तकावर खुणा करून घ्यायचो. 

आडिवरे हायस्कूलमध्ये हिंदीचा पाया पक्का करायच्या त्या म्हणजे तेलंग मॅडम. पाचवी-सहावीला ते अप्रतिम हिंदी शिकवायच्या. त्यांचा भारदस्त आवाज हिंदीला शिकवताना शोभणारा होता. विद्यार्थ्यांना हिंदी भाषा समजावी ही त्यांची तगमग. पाचवीला येणारी मुलांना हिंदी खूप छानपणे त्या समजून सांगायच्या आणि तितक्याच आवडीने शिकवायच्या.

श्री.पुंडपाळ सर ज्याप्रमाणे इंग्रजी शिकवायचे त्याचप्रमाणे श्री. जी. के. जाधव सर इंग्रजी शिकवायचे. सातवी आणि आठवी या दोन्ही वर्गांसाठी ते इंग्रजी शिकवत. त्याचा आवाजात कोल्हापुरी ठेवणीचा. त्यांचंही इंग्रजीवर भारी प्रभुत्व. ते इंग्रजी व्याकरण उत्तम शिकवयाचे. इंग्रजी धडा शिकवताना मधेच एकाद्या शब्दाचा अर्थ काय असे विचारायचे आणि उत्तर देता आलं नाही किंवा अर्थ सांगता आला नाही की, कसं होणार तुझं पोरा? हे ठेवणीतलं वाक्य बोलायचे. 

चित्रकला हा विषय तसा सर्वांच्या आवडीचा. ज्या दिवशी चित्रकला विषय असायचा तो जरा भारीच वाटायचा. श्री. जाधव सर हे चित्रकला विषय शिकवायचे. वर्तुळात डिझाईन काढताना 'करकटक' कसा वापरायचा हे भारी शिकवायचे. मात्र निसर्गचित्र फळ्यावर रेखाटताना ते जास्त मग्न व्हायचे. त्यांनी फळ्यावर चित्र काढलं की अख्खा फळाच नव्हे तर वर्ग भारी वाटायचा. काही मिनिटांमध्ये ते चित्र कसं काय काढतात याचं अप्रूप वाटायचं.  

आडिवरे शाळेमधील सर्वाधिक हँडसम व्यक्तिमत्व म्हणजे श्री. कानविंदे सर. देखणं व्यक्तिमत्व. पाचवीला ते इंग्रजी शिकवायचे. कार्यानुभवही अतिशय उत्तमरीत्या शिकवायचे. तसंच भागवत मॅडमही अतिशय सुंदर असं मराठी शिकवायच्या त्याही पाचवी-सहावीला मराठी शिकवत असतं. तर नाईक मॅडमही छान मराठी, भूगोल शिकवायच्या. तर आडिवरेकर मॅडम या उत्तमरित्या गणित शिकवायच्या. 

आडिवरे हायस्कूल नावारुपाला आणायला अनेक शिक्षकांचा हातभार लागला आहे हे निश्चितच आहे. आडिवरे शाळेतील आणि ज्यूनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणाऱ्या या सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेनिमित्त वंदन.




Post a Comment

0 Comments