सावधान, गावं गिळंकृत होत आहेत...
संपादकीय
आडिवऱ्याचे नाव घेतले की श्री महाकाली देवीची आठवण येते. गेल्या पंचवीस - तीस वर्षात आडिवरे परिसराचा विकास होत गेला. मात्र आडिवऱ्यातील गाव आणि वाड्यांचे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. पाखाडी, रस्ता, पाणीपुरवठा, वीज यासारखे प्रश्न सुटले म्हणजे गावाचा आणि वाडीचा विकास झाला असे नाही. रुढी, संस्कृती, परंपरा जपल्या म्हणजे विकास होतो हा गैरसमज दूर करण्याची वेळ निघून गेली आहे. आता काही दिवसात विस्थापित होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. रुढी, परंपरा जपण्याच्या नादात विस्तापित होण्याचे स्लो पॉयझनिंगकडे दुर्लक्ष होत आहे.
महात्मा गांधीजींनी खेड्यांकडे चला असा संदेश दिला. हा संदेश आता व्यापारी, उद्योजक आणि राजकारण्यांनी तंतोतंत जपला. पोटासाठी वाड्याच्या वाड्या ओस पडत आहेत. पैशांचे सोंग करता येत नाही. एक गाव किती जणांना रोजगार पुरवणार हा प्रश्न असतो. जो तो उठतो आणि पोटापाण्याची सोय करण्यासाठी शहरांकडे जातो. त्यात गैर काही नाही. वर्षातून एक - दोन वेळा गावाकडे जातो. चांगली नोकरी मिळाली तर ठीक नाही तर, ना धड शहरात राहणे परवडत ना गावी. त्यातच गावातील जमिनी परस्पर विकल्या जात आहे. आडिवऱ्यासारख्या परिसरात दलालांची चलती आहे. त्यामुळे एक दोन एकर जमीन नावे असली तरी फुशारकी मारण्याचे दिवस संपले आहेत.
सध्या आडिवरे वाडीखुर्दमधील एमआयडीसी प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. लोकांना काही माहिती नाही, तरी जमीन मोजणी होत आहे. मुळात या प्रकल्पासाठी काहींच्या जमिनी परस्पर विकल्या गेल्या असल्याची चर्चा आहे तर काहींना जमिनी विकण्यासाठी दलालच दबाव आणत असल्याची चर्चा आहे. या जमिनी परस्पर विकल्या गेल्याच कशा, हा प्रश्न कुणाला पडत नाही आणि जमिनी मिळवण्यासाठी लढण्याइतपत पैसा नाही. त्यामुळे आपलेच दात आणि आपलेच ओठ. दुर्दैव हे की, जे जमिनी विकत आहेत ते आपलेच आहेत आणि स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी गावाचा गळा दाबत आहेत. कोस्टल डेव्हलपमेंटच्या नावाखाली राजापूर तालुका पोखरला जात आहे. त्याचा मोठा फटका आता आडिवरे परिसरातील गावांना बसत राहणार आहे. अनेक छोठे - मोठे प्रकल्प आडिवरे परिसराच्या तीस ते पस्तीस किलोमीटर परिसरात आहेत. याची झळ आज ना उद्या आडिवरे परिसराला बसणार आहे.
विशेष म्हणजे गावे गिळंकृत असताना राजकीय नेतृत्व अध्यात-मध्यात भूमिका निभावत आहेत. विकास हवा, रोजगार उपलब्ध होईल याची स्वप्न दाखवून जमिनी हडपल्या जात आहेत. प्रकल्प झाल्यानंतर तांत्रिक कौशल्य नसल्याची कारणे देऊन स्थानिकांना डावलले जात आहे. यापुढेही हेच होत राहणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांकडे नाही राहणार जमीन ना राहणार गाव, ना राहणार नोकरी-व्यवसाय. आडिवरे वाचवायचे असेल तर काही वेळ गेला आहे, मात्र जो काही वेळ आहे त्याचा वापर करावा लागणार आहे. आर्थिक उन्नतीसाठी एकत्र यावे लागणार आहे. जमिनी राखण्यासाठी लढा उभारावा लागणार आहे. मात्र त्यासाठी पुढाकारही घ्यावा लागणार आहे. राजकीय नेतृत्व तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील याची शाश्वती नाही. मग ते कोणत्याही पक्षाचे असो.
सद्यस्थितीत गाव शिल्लक आहे आणि गावाच्या बाहेरचा परिसर विकला जात आहे. हे सर्व ठापूसारखे झाले आहे. चारी बाजूंनी पाणी आहे आणि त्यात दोन चार एकरवर वसलेला गाव आहे. याचा अर्थ आताच ओळखा, काही दिवसांनी बाहेर जाण्यासाठी सरकारी रस्त्याशिवाय दुसरी जागा तुमच्याकडे नसेल. अनेक गावांची कातळांवर आंबा - काजूच्या बागा फुलत आहेत. त्याचे मालक कोण आहेत, याची चौकशी केली तरी पायाखालची जमीन सरकू शकते. काही कातळांवर तर चिरेखणी प्रस्तावित असल्याच्या चर्चा आहेत. हे चिरे कुणाची घरे बांधणार आणि कुणाची घरे उद्ध्वस्त करणार आहेत, हे काळच ठरवणार आहेत. हे वाचवणेही हातात राहिलेले नाही.
एखादी रुढी, परंपरा, संस्कृती जपायची असेल तर सर्वच घराबाहेर पडतात. योग्य काय, अयोग्य काय याचा सारासार विचारही केला जात नाही. त्यासाठी दंडवैगरे आकारले जातात. अरे, जेथ गावच गिळंकृत होण्याच्या मार्गावर आहेत त्या ठिकाणी रुढी, परंपरा वाचवून नेमके काय साध्य करणार आहोत ? भविष्यात गावांची गावठाणं होण्यापासून वाचवायचे असेल तर 'गावगर्जना' होणे महत्त्वाचे आहे.
0 Comments