जीवशास्त्रातही जीव ओतणारे हेडमास्तर : चव्हाण सर
श्री महाकाली इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज आर्ट्स आणि सायन्स आज घवघवीत यश मिळवत आहे यात अनेक शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचा मोलाचा आणि अनमोल वाटा आहे. यामध्ये ज्यांचे आवर्जून नाव घ्यावं लागेल ते म्हणजे चव्हाण सर यांचे.
श्री. चव्हाण सर आता आडिवरेवासी झाले आहेत. मात्र एक मुख्याध्यापक कसे असावेत याचं ते उत्तम उदाहरण आहेत. हेडमास्तर असावेत तर चव्हाण सर यांच्यासारखे असे अनेक विद्यार्थी छातीठोकपणे सांगू शकतात. शिडशिडीत शरीरयष्टी, हाफ शर्ट, डोळ्यांतून समजणारी भाषा आणि स्मित हास्य, चालण्याची ढब ही त्यांची काही खास वैशिष्ट्ये आहेत. यात महत्त्वाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे असलेली कमालीची शिस्त. चव्हाण सरांमुळे शाळेला एक वेगळीच शिस्त होती. ते जेव्हा मैदानातून चालायचे किंवा त्यांच्या कॅबिनमधून बाहेर पडायचे तेव्हा त्यांच्या आदरयुक्त शिस्तीचं नेहमीच दर्शन व्हायचं. विनाकारण धावणारे विद्यार्थी जागच्या जागी उभे राहायचे आणि नंतर हळूहळू चालायचे. त्यातच कुणी जास्त मस्ती करीत असतील तेव्हा त्याला बोलावून तिथल्या तिथेच शिस्तीचा मस्त धडा शिकवायचे...बाळा इकडे ये असं म्हणून ते बोलवायचे आणि पुढचं काय सांगायची गरज नाही....मात्र सर पुन्हा कॅबिनमध्ये गेले की विद्यार्थ्यांची पुन्हा किलबिल सुरू व्हायची...
चव्हाण सरांची शिकवण्याची पद्धत ही तर अफलातून होती. त्यांचं शिकवणं हे एक खास वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. आमच्या वेळी ते ८वी ते १०वीपर्यंत जीवशास्त्र शिकवायचे. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत विद्यार्थ्यांना समजेल इतकं शिकवण्याची तळमळ होती. जीवशास्त्र विषयावर त्यांची जबरदस्त कमांड होती. जीवशास्त्र शिकवताना ते त्या विषयात इतके जीव ओतायचे की सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांवा ते समजलंच पाहिजे.
जीवशास्त्र शिकवण्याची त्यांची शैली छानच होती. त्यांनी सलग कितीही तास शिकवलं तरी कंटाळा म्हणून यायचा नाही. ते जेव्हा जीवशास्त्र शिकवायचे तेव्हा त्यांच्या काही खास लकबी होत्या. 'कळलं का?', 'नर्मदेचे गोटे' या शब्दांचा ते अतिशय चपखलपणे वापर करायचे. 'पोरा, सांग पाहू याचं उत्तर काय आणि या प्रश्नाचं उत्तर दिलं की म्हणायचे, पोरानं वाचलेलं दिसतं'. 'टुबा पेटल्या का?' आणखी एक शब्द. शिकवता शिकवता तुम्हाला समजलं की नाही हे विचारताना ते टुबा पेटल्या का असा शब्द प्रयोग करायचे. त्यांच्या या शिकवणीत असे ठराविक शब्द आले की जीवशास्त्रही हलकंफुलकं वाटायचं. इतकंच नव्हे तर त्यांचा मारही अगदी मऊमऊ असायचा.
जीवशास्त्र शिकवतावा आणखी एक वाक्य त्यांचं खास असायचं. ते म्हणजे, 'पोराला अमृताच्या डोहात बुडवलं तरी पोर म्हणतं मी थेंबभरही अमृत प्यालो नाही'. विविध शब्दांची, वाक्यप्रचारांची पेरणी करत सायन्समधला जीवशास्त्र विषय ते इतक्या आत्मीयतेने शिकवायचे की जीवशास्त्र शिकवायचं तर चव्हाण सर यांनी...
जीवशास्त्रात त्यांना रस असला तरी क्रीडा प्रकारातही त्यांना आवड होती. एकदा तर एका कार्यक्रमावेळी चव्हाण सर, पुंडपाळ सर, हजारे सर, जी. के. सर यांनी लाजवाब लेझीम सादर केली होती. त्यावेळी आपले सर काय मस्त लेझीम खेळतात रे असे शब्द अनेक विद्यार्थ्यांच्या तोंडावर आले होते. ते जेव्हा लेझीम खेळत होते त्यावेळी लय भारीच मजा वाटत होती.
शाळेसाठी चव्हाण सरांनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांच्या कार्यकाळात शाळेचा आलेख चढता होता...आजही चढत्या यशाची परंपरा कायम आहे. कब्बडी, खो खो यासारख्या खेळात आडिवरे शाळेचे अनेक विद्यार्थी चमकले आहेत. अभ्यासातही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. आडिवरे येथे ज्युनिअर कॉलेज सुरू करण्यात अनेकांचा हातभार लागला, मात्र चव्हाण सरांचा त्यात मोलाचा वाटा आहे. यात विशेष म्हणजे जेव्हा बारावीच्या सेंडऑफ होता त्याच दिवशी ज्युनिअर कॉलेजला परवानगी मिळाल्याची माहिती आली. त्यावेळी डोळ्यात पाणीच आलं. श्री महाकाली ज्युनिअर कॉलेजची नवी ओळख निर्माण झाली.
अशा या चव्हाण सरांचं मार्गदर्शन ज्यांना लाभलं ते विद्यार्थी भाग्यशालीच म्हणावे लागतील. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना याच ज्युनिअर कॉलेजच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होण्याचं भाग्य लाभलं ही लाखमोलाची गोष्ट आहे. असे हे शिस्तप्रिय, जीवशास्त्रात जीव ओतून शिकवणारे आणि हाडाचे हेडमास्तर श्री महाकाली इंग्लिश स्कूल आडिवरे लाभणं ही गौरवाची गोष्ट आहे. तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात घर करून राहणाऱ्या आपल्या चव्हाण सर यांना सॅल्युट!
0 Comments