असा दादा होणे नाही...
असा दादा होणे नाही... श्याम दादा...श्याम पाथे...नको असलेल्या वयातच आम्हा सर्वांना हवाहवासा वाटणारा दादा जीवाभावाची साथ सोडून गेला....आता आठवणीचे, प्रेमाची अश्रू साथ देत राहतील....
श्याम दादा माझ्या मावशीचा मुलगा...मे महिन्यात मुंबईतून सर्वच जण मामाच्या (आडिवरे, शेडेकरवाडी) गावी यायचे. 1985 पासून श्याम दादा कोणत्या कोणत्या वर्षी गावी यायचा....त्यावेळी आम्ही लिंबूटिंबू...पण आमच्या दादाचं आपलेपणाचं दादापण काय होतं ते जाणवलं मुंबईत आल्यावर... सांताक्रूझमध्ये...आमचं घर आणि दादाचं घर पाच मिनिटांच्या अंतरावर....तेव्हा कधी ऑफिसला जाताना तर कधी रविवारी मावशीच्या घरी जाणं व्हायचं....मग मावशी-काका भेटायचे...दादा भेटायचा...संध्या ताई, स्मिता ताई आणि माहेरी आली असेल तेव्हा सीमा ताईही भेटायची.. माचिवलले भाऊजी भेटायचे...या तीन बहिणीमध्ये दादा वेगळाच वाटायचा...या तीन गोऱ्या बहिणीमध्ये हा काळ्या रंगाचा आमचा श्याम दादा...फार प्रेमानं विचारपूस करायचा... नोकरीबद्दल
सांगायचा...शिक्षणाबाबत बोलायचा... मला त्याचं खूप अप्रूप वाटायचं ते म्हणजे चाळीतले अगदी कुणीही डोकावून 'श्याम्या' असे हाक मारून जायचे.
दादा जेव्हा केव्हा भेटायचा त्याच्या चेहऱ्यावर हास्य खुळलेलं असायचं. त्याची शुभ्र दंतपंक्ती त्याच्या चेहऱ्यावर फारच खुलून दिसायची... त्याचा चाळीतला वावर हा सर्वांना हवाहवासा वाटायचा. त्यांच्या चाळीत होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवातील वावर आणि सहभाग मोठा असायचा... त्याच्याबरोबर गणपती मंडळात वावरताना तो जाणवत होता.. अशा आमच्या श्याम दादाचा सामाजिक सहभाग 'दुसऱ्यांसाठी धावणारा' असा होता...तसाच लाडक्या ताईंचा आणि भावांचा तो लाडला दादा होता. मित्रांसाठी तो त्यांचा खास मित्र होता. ज्यांना ज्यांना त्याचा सहवास लाभला त्यांना आमच्या श्याम दादाचं अनोखं रूप अनुभवायला आलं असेल हे नक्की.
माझ्या लग्नाच्या वेळीही श्याम दादाने खूप धावपळ केली होती. ऐन वेळी धावाधाव करून गाडी मिळवून दिली होती. मात्र आम्ही दादाच्या लग्नात धमाल केली होती. आम्ही दादाला कधी तोंडावर नाही, मात्र पाठीमागे म्हणायचो, आमचा दादा सावळा असला तरी आम्हाला गोरी वहिनी मिळाली. असा हा दादा आईवाडिलांप्रती अतिशय संवेदनशील होता. कधी कधी सांगायचा आई वडिलांना विसरायचं नाही. आई वडिलांना विसरतात ती मुलं कसली? दादानं तो शब्द शेवटपर्यंत पाळाला.
असा हा श्याम दादा सहली ऑर्गनाइज करण्यात 'दादा'...दादा माणूस होता...दरवर्षी पावसाळी पिकनिक ठरलेली. या वर्षी पिकनिकला कुठे जायचे, कसे जायचे याचे नियोजन करायचे.... बाकीच्यांनी फक्त गाडीत येऊन बसायचे... पिकनिकला जाण्यापूर्वी पिकनिक स्पॉट पाहून येणं हे दादाचं खास वैशिष्ट्य. पिकनिकच्या गाडीत बसल्यावर विनोद, गाणी यांची तुफान मजा यायची...श्याम दादावर रंगावरूनही विनोद व्हायचे. दादा वहिनी दोघेही दाद द्यायचे. पिकनिकला खाण्याची चंगळ असायची... दादाबरोबर दोन वेळा पिकनिकला जाण्याची संधी मिळाली. अनेकदा माझ्या वैयक्तिक कामामुळे जाताही आलं नाही. श्याम दादा पिकनिक सुरू होण्यापूर्वीपासून ते अगदी घरी पोहोचेपर्यंत सर्वांची काळजी घ्यायचा... असा हा दादा आजही आमच्यात आहे. अगदी आसपास....सर्वांच्या मनामनात.... घर करून राहिलेला..... अनंत प्रवासाला निघालेला आमच्या श्याम दादाचा केव्हाही फोन येऊ शकतो... काय यंदा पिकनिकला येणार का....................................

0 Comments