Header Ads Widget

हजारो विद्यार्थ्यांना 'चमकवणारे' प्रकाश हजारे सर

 


हजारो विद्यार्थ्यांना 'चमकवणारे' प्रकाश हजारे सर

श्री महाकाली इंग्लिश स्कूल नवेदर आडिवरे या शाळेच्या शिक्षकवृंदांनी अनेक आदर्शवादी पिढ्या घडवल्या आहेत. या शिक्षकवृंदात ज्या शिक्षकांची नावे घ्यावीत त्यात हजारे सरांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल...

प्रकाश ज्ञानदेव हजारे... डॅशिंग व्यक्तिमत्व असंच त्यांचं वर्णन करावं लागेल. डोळ्यांमधून दिसणारा धाक आणि आवाजात जरब... असे हे हजारे सर सर्वांचे लोकप्रिय. अर्थात विद्यार्थीप्रिय... 1992 पासून 2005 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना हजारे सरांचा सहवास लाभला त्या विद्यार्थ्यांना हजारे सर अविस्मरणीय आहेत.

मी आठवीत असताना हजारे सर आमचे वर्गशिक्षक होते. ते पीटी या विषयाबरोबरच मराठी आणि इतिहास शिकवायचे. मराठी शिकवताना जेवढी तळमळ असायची तेवढीच इतिहास शिकवताना..त्यात कोल्हापुरी उच्चारांचा बाज असायचा... मात्र ते जास्त रमले ते श्री महाकाली इंग्लिश स्कूलच्या मैदानावर. या मैदानावर हजारे सरांचा आवाज घुमायचा. त्यांच्या आवाजाला साथ द्यायची ती त्यांची शिट्टी. हजारे सरांची आठवण आली की आजही मैदानावरचा शिट्टीचा आवाज कानात घुमतो. सर कुठेतरी आजूबाजूला आहेत याचा भास होतो.

हजारे सरांचा स्वभाव जसा प्रेमळ होता तसा तापटही होता. मराठी शिकवताना ते ओरडायचे नाहीत, मात्र खो-खो, कबड्डी खेळताना ते हमखास ओरडायचे. यामागे विद्यार्थी घडावेत आणि शाळेचं नाव उज्ज्वल करावं हाच एकमेव हेतू असायचा. 'अरे उतरा की मैदानात' हे शब्द कानावर पडले की एक जोश, उत्साह संचारायचा.

तसा मी मैदानी खेळांमध्ये न रमणारा. मैदानाच्या बाजूला उभं राहायचं आणि आरडाओरड करत खेळ पाहायचा. माझी शरीरयष्टी आणि मैदानी खेळ हे न जमणारे समीकरण. मात्र एकदा हजारे सरांनी अनेक विद्यार्थ्यांची नावं घेतली त्यात माझंही होतं. बरं सरांना माझं नाव घेऊ नका असं सांगायचं कसं?हिम्मतच होत नव्हती. शेवटी खेळायचं ठरलं. पीटी तसा शेवटचा तास असायचा. कधी सातवा तर कधी आठवा.

हजारे सर मैदानात शिट्टी आणि हातात काठी घेऊनच उभे राहायचे. कबड्डी खेळताना लाथ बसेल याची मला खूपच भीती वाटायची. मग सर म्हणायचे 'अरे घाणेकरा, काय घाबरतोस व्हय...मग माझी जागा दोन खेळाडूंच्या मध्ये व्हायची. दोघांनी दोन्ही बाजूने हात धरला की हायसे वाटायचे. कारण कोणाची लाथ बसणार नाही आणि सरांच्या हातची काठीही बसणार नाही याची खात्री वाटायची.

खो-खोमध्ये मी जास्त रमलो. त्यावेळी हजारे सरांचे मार्गदर्शन असायचेच. मात्र सूचना अमलात आली नाही की सरांची काठी पार्श्वभागावर बसायची. खो-खो शिकवताना हजारे सरांचं बारीक लक्ष असायचं. खो योग्य ठिकाणी बसला पाहिजे,  खांब मारता आला पाहिजे, त्यापेक्षा डाय मारता आली पाहिजे असा त्यांचा दंडकच असायचा. एकदा का त्यांच्या तोंडून डाय मार असा शब्द आला की डाय मारावीच लागायची....नाही तर पायावर वळ उठायचे. आडिवरे हायस्कूलचा संघ उत्तम घडावा अशीच त्यांची तळमळ असायची. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ हा राज्य पातळीपर्यंत धडक मारायचा. तेव्हा त्यांचा ऊर अभिमानाने भरून यायचा.

15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे रोजी परेड असायची. ही परेड पाहायला खूप मजा यायची आणि खूप आवडायचं. हे दहावीचे विद्यार्थी परेड एवढ्या लयबद्ध पद्धतीने करायचे की ती पाहातच राहावे असं वाटायचं. आपल्याला या परेडमध्ये सहभागी व्हावं असं मनोमन वाटायचं. दहावीत संधी मिळाली, मात्र  कधी पाय तर कधी हात यांचा ताळमेळ चुकायचा.  शेवटी हजारे सरांनी प्रॅक्टिस करून घेतलीच. खरंतर परेड करताना पाऊल चुकलं तरी सरांची काठी चुकायची नाही. मला मात्र सतत भीती वाटत असायची. अखेर परेडमध्ये सहभागी होता आलं आणि सरांमुळे स्वप्न साकार झालं.

मल्लखांबाचे तसंच. मल्लखांबावर पहिली उडी झोकात बसायची मात्र दुसरी उडी घ्यायला कोणीतरी खालून धक्का द्यावा लागायचा. मल्लखांबाच्या टॉपवर बेंबी लावायची आणि समोर मान करायची आणि त्यानंतर हात लांब करायचे.. हे  करताना सर खालूनच म्हणायचे, अरे त्याला पकडून ठेवा पडेल खाली. मी तर थरथरत असायचो. एवढं जमलं की वाचलो असं म्हणायचं आणि खाली यायचं. हजारे सर शिकवताना जसे मारायचे तशी काळजीही घ्यायचे.

हजारे सरांचा स्वभाव तापट असला तरी ते प्रेमळ होते. अभ्यास-खेळा पलीकडेही ते तुमची चौकशी करायचे. शाळेपासूनच जवळ असलेल्या भिकारवाडी आताची भाकरवाडी येथे ते राहत होते. रस्त्यात भेटले तरी आपुलकीने विचारायचे. "घाणेकरा, कसा आहेस? अभ्यास चांगला कर.इतिहासात चांगले मार्क पडले पाहिजेत. मी मात्र थोडा भीतीने हो सर म्हणत पुढे होत असे. 

खो- खो असो की कबड्डी,  गोळा फेक असो की भाला फेक असो,  उंच उडी असो की लांब उडी, 100 मीटर धावणे असो की 400 मीटर..... हजारे  सरांनी अनेक विद्यार्थी घडवले. क्रीडा क्षेत्रात आडिवरे शाळेचं नाव चमकवण्यात हजारे सरांचा मोठा वाटा आहे. श्री महाकाली इंग्लिश स्कूलचे नाव चमकवणारे, प्रकाशमान करणारे हजारे सर सर्वांसाठी हिरो होते. शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेकदा पदरमोड केली. याचा त्यांनी कधी बोभाटा केला नाही. वरून अशांत वाटणारी सर चंद्रासारखे शीतल होते.

शाळा आणि विद्यार्थ्यांना प्रकाशमान करणाऱ्या प्रकाश हजारे सरांनी 2005 मध्ये सर्वांचा निरोप घेतला. त्यांची  एक्झिट मनाला चटका लावणारी होती. ज्या शाळेला हजारे सरांसारख्या सरांची गरज होती ते विद्यार्थ्यांना सोडून गेले होते. पोरके करून गेले, न भरून येणारी पोकळी निर्माण करून गेले. ज्या विद्यार्थ्यांना हजारे सरांचा सहवास लाभला ते विद्यार्थी सरांची आठवण काढत असतील... हजारे सर आज हवे होते...पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासाठी...


Post a Comment

0 Comments