अशोक भट सर : 'मराठीची मास्टरकी'
मराठी असे आमची मायबोली आणि ही मायबोली शिकवणारे उत्तम असतील तर मग दुग्धशर्करा योग्यच म्हणावा लागेल. विविध टप्प्यावर मराठी विषय शिकवणारे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवाची शिदोरी मोकळेपणाने देत असतात. असेच सर्वांचे लाडके सर म्हणजे भट सर...अशोक भट सर...अगदी मनमोकळं आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व.
श्री महाकाली इंग्लिश स्कूल नवेदर आडिवरे या नावाजलेल्या शाळेत मराठी विषय शिकवणारे भट सर म्हणजे मराठीची मास्टरकी! आमच्यापेक्षा जुने विद्यार्थी अजूनही सांगतात, मराठी शिकवावी तर भट सरांनी... हीच त्यांच्या शिकवणीची पोचपावती.….त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना भट सरांच्या ज्ञानाची शिदोरी लाभली ते सारे 'लाभले आम्हास भाग्य भट सरांचे' असेच म्हणतील.
भट सरांचे व्यक्तिमत्त्व अगदी रुबाबदार. गोरागोरा वर्ण. भारदस्त उंची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेमळ डोळे...त्यांच्या तरुण वयात ते नक्की राजबिंडे होते असे म्हटले तर वावगे नाही.
अशा या भट सरांची ओळख व्हायची ती आठवीत आणि त्यांची साथसंगत लाभयची ती बारावीपर्यंत. मराठी विषयावर त्यांची पकड जबरदस्त होती. अगदी समरसून आणि तन्मयतेने ते मराठी शिकवायचे. आमच्या वेळी भट सर नववी बचे वर्गशिक्षक. ते वर्गात यायचे तेच हसमुख चेहऱ्याने. त्यांच्या ओठांवर सतत स्मित असायचे. त्यांचा हा प्रसन्न चेहरा पाहून संपूर्ण वर्ग प्रसन्न व्हायचा. शिकवताना ते कधी चिडलेले पाहिले नाहीत, मात्र चिडले की सोडत नसत असे ऐकले आहे.
भट सरांचे मराठीवरील प्रभुत्व वादातीत आहे. धडा किंवा कविता किंवा साहित्याचा कोणताही प्रकार असो बारीकसारीक कंगोऱ्यासह ते समजून सांगायचे. समजावून सांगण्याची पद्धत इतकी सोपी, सहज होती की कठिणातील कठीण 'सोपे' होऊन जायचे. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा धडा त्यांनी इतक्या तन्मयतेने आणि पोटतिडकीने शिकवला की त्याला तोडच नाही. धड्यातील प्रत्येक 'प्यारा' उलगडून सांगायचे. त्यामुळे त्यांचा क्लास कधी कंटाळवाणा झाला नाही. हसत हसत, विनोदाचा शिडकावा करत आणि अवांतर उपयुक्त माहिती देत सरांचा क्लास केव्हा संपायचा ते कळत नसे.
भट सर कविता शिकवायला लागले की वर्गामधील वातावरण थोडे वेगळेच असायचे. काव्याचा कोणताही प्रकार असो रसांसहित ते शिकवायचे आणि आम्ही समरस होऊन जायचे. कवितेचा, त्यातील पंक्तीचा, शब्दाचा अर्थ इतका समजून सांगायचे की कविता कळलीच पाहिजे. अभंग शिकवताना तल्लीन होत असत. संतांचे अभंग, त्यातील काही शब्द आम्हाला कळत नसत, मात्र सर समजावून सांगत. अलंकार, वृत्त शिकवताना सर जी उदाहरणे द्यायची ती लक्षात राहण्यासारखी. 'औषध नलगे मजला', 'औषध नल गे मजला',
'तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली , जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो।।'
त्याचबरोबर
'मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!'
ही उदाहरणे स्पष्टीकरणासह देत. प्रेमाचा गुलकंद ही कविता, पृथ्वीचे प्रेमगीत या कविता आजही अनेक विद्यार्थ्यांच्या लक्षात असतील. भट सर यांना संगीताची जाण होती, त्यामुळे ते कधी कधी कविता गाऊन दाखवायचे.
भट सरांचे जसे मराठीवर प्रभुत्व होते तसे संस्कृत आणि भूगोल या विषयांवर होते. अनेक संस्कृत सुभाषिते शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या तोंडपाठ होती.
भट सर तसे प्रेमळ. बाईकवरून येताना कधी कधी एखाद्या विद्यार्थ्याला घेऊन येत असत. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुकही करायचे. आमचा मित्र अनिल भालवलकर याचे वर्गात नेहमी कौतुक होत असे, त्याला कारण होते ते अनिलचे नितांत सुंदर अक्षर... भट सर म्हणायचे, 'अक्षर असावे तर ते अनिल भालवलकर याच्या अक्षरासारखे...सुंदर आणि पाणीदार..' असो.
अशा या भट सरांचे अनेक विद्यार्थी आजही त्यांच्या शिकवणीची प्रशंसा करतात. मराठी विषय शिकवावा तो भट सरांनी... कारण या सर्वांना एकच गोष्ट माहीत आहे ती म्हणजे - 'भट सर : मराठीची मास्टरकी'
0 Comments