Header Ads Widget

देसाई सर : बीजगणिताचे 'बादशहा'




विजय देसाई सर : बीजगणिताचे 'बादशहा'

श्री महाकाली इंग्लिश स्कूल आडिवरे असं नाव ऐकलं तरी अभिमानाने मान उंचावते आणि या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचे नाव ऐकलं की छाती 56 इंचापेक्षा जास्त फुगते. असेच एक सर्वांचे लाडके शिक्षक म्हणजे देसाई सर. विजय देसाई सर... बीजगणितातले बादशहा.

देसाई सरांच्या नसानसांत बीजगणित होतं. इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत ते गणित शिकवायचे. मूर्ती छोटी होती पण कीर्ती फार मोठी होती. दहावीचे वर्गशिक्षक म्हणजे देसाई सर अशी त्यांची खास ओळखही होती. अनेक वर्षे हे 'समीकरण' घट्ट होतं. सरांची पहिली भेट व्हायची ती आठवीमध्ये...सरांच्या सहवासात गणित शिकायची ती सुरुवात असायची. अतिशय स्पष्ट उच्चार हे एक वैशिष्ट्य. सर्वांना समजेल असं गणित शिकवणं ही त्यांची तळमळ असायची आणि खासियत होती. गणित कोणत्याही प्रकारचे असो ते सोप्या पध्दतीने शिकवायची त्यांची जी हातोटी होती तिला तोडच नव्हती. 

सर, समीकरण अशा प्रकारे समजवायचे की पुन्हा समजावून सांगा अशी म्हणायची वेळ यायची नाही. मग ते समीकरण साधं असो की कंसातील... आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांना ते पोटतिडकीने गणित शिकवायचे, दहावीतल्या विद्यार्थ्यांसाठी ते विशेष मेहनत घ्यायचे. समीकरण असो की प्रमेय....जीव ओतून ते शिकवायचे.  गणितात मार्क्स कसे मिळवता येतात, सूत्रं कशी लक्षात ठेवावी, मग या सूत्रांचा वापर करून गणित कसं सोडवायचं हे देसाई सरांकडून शिकायचं आणि त्यांनीच ते शिकवावं. देसाई सरांनी शिकवलेले सिद्धांत आणि सूत्रं त्यांचे विद्यार्थी आजही विसरले नसतील. 

कोणती प्रमेय परीक्षेत येऊ शकतील हे सांगतानाच त्यांची प्रॅक्टिसही करून घ्यायचे. बाकोबा, कोबाको हे शब्द आजही आठवले की सरांची आठवण येते. ते साधे होते, पण शिस्तीचे होते. गृहपाठ दिला तो पूर्ण झालाच पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असायचा. गृहपाठ पूर्ण नसेल तर माफी नाही. एक 'धबुका' पाठीत बसायचा. मात्र एखादं गणित सोडवता आलं नाही तर ते पुन्हा समजावून सांगायचे. असे हे गुणाचे सर...

देसाई सर गणिताचे मास्तर असले तरी प्रेमळ होते. शाळेत जाताना कुठलेही शिक्षक येताना दिसले की आम्ही विद्यार्थी पाच फूट लांबच...बघितलं न बघितलं असं करायचं आणि मान खाली घालून पुढे जायचे... इतका तो 'आदर्शवादी' धाक होता. सर समोरून आले तरी गोड हसायचे आणि काय 'घाणेकरा' असे हाक मारायचे.. आम्ही मात्र अजून काही विचारू नयेत यासाठी हो सर म्हणायचे आणि लगबगीने चालू लागायचो. 

सरांचं व्यक्तिमत्त्व सुंदर होतं. हसमुख असणं हे त्यांचं वैशिष्ट्य. सरांची गणितावर जेवढी पकड होती तेवढी भूगोल या विषयावरही होती. ते भूगोल विषयही अतिशय सुंदररीत्या शिकवायचे. आजवर त्यांचे हजारो विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत आहेत. या सर्वांना सरांची आठवण आल्याशिवाय राहत नसेल. कारण सरांनी या सर्वांचा गणिताचा पायाच भक्कम घालून दिला आहे, ज्यावर जीवनरुपी इमारत उभी आहे.

आज गुरुपौर्णिमा. सरांचे ऋण कधीही न फिटणारे. सरांचं व्यक्तिमत्त्व खूप मोठं आहे. इतक्या शब्दांत ते सामावणार नाही. अशा या आमच्या लाडक्या सरांना त्रिवार वंदन!!!


Post a Comment

0 Comments