आम्ही आणि आमचे सोबती
रत्नागिरी जिल्हा आणि राजापूर तालुक्यातील आडिवरे पंचक्रोशीतील तळीवाडी ही अवघी पंधरा ते वीस घरांची वाडी. निसर्गाच्या सान्निध्यातील टुमदार वाडी म्हणेज तळीवाडी. पूर्वेला मारुतीचं सुंदर, आकर्षक असं मंदिर, पश्चिमेला शेतीवाडी, दक्षिणेला चढ-उताराचा भाग आणि विशेष म्हणजे उत्तरेला मुचकुंदी खाडी. वाडीपासून मिनिटभर अंतरावर असलेली मुचकुंदी खाडी हा सर्वांच्या आकर्षणाचा विषय. अशा या तळीवाडीत आमचं घर कौलारू. 1965 च्या वादळात अनेक घरांचं नुकसान झालं होतं. त्यानंतर माझे आजोबा तुकाराम घाणेकर यांनी कौलारू घर बांधलं. माजघर, एक पडवी आणि घरालाच लागून मागच्या बाजूला दुसरी पडवी. या दुसऱ्या पडवीत आमच्या गुरांचा राबता होता. अर्थात गोठा. या गोठ्यालाच गावात वाडा असंही म्हणतात. आमच्या गोठ्यात ज्या गायी होत्या, वासरं होती ती म्हणजे माणुसकीनं भरलेली दुसरी माणसं होती. आमच्या या वाड्याच्या नंदनवनात गायींची संख्या जास्त होती. गावात एखाद्याच्या गोठ्यात दहा-बारा गायी, वासरं, बैल असणं मोठं मानलं जायचं. आमच्या वाड्यात सहा-सात गायी आणि त्यांची वासरं अशी दहा-बारा गुरं असायची. या सर्व गुणी गायी होत्या. वाड्यात पाडा जन्मायचा नाही. कधी तरी एखादा पाडा जन्मला तर, अन्यथा पाडीच जन्मायच्या. आजोबांच्या काळातही अर्थात 1975 ते 1994च्या काळात आमच्या गायींची नावं मात्र लय भारी होती.
आयत्री(अर्थात गायत्री) सर्वांची आवडती गाय. गायत्रीचं आयत्रीचं झालं. तांबड्या-पांढऱ्या रंगाची डॉली, पांढरी सफेत सरिता, काळी पण डोळ्यात भाव दिसणारी टिकळू, चकळू, पवित्रा, तांबस तपकरी रंगाची भारती...अगदी मुलींना नावं द्यावीत अशी आमच्या गायांची नावं होती. या सर्वात भारतीने एका पाड्याला जन्म दिला होता. त्यावेळी आजोबांना कुणीतरी सांगितलं की, गोठ्यात पहिल्यांदा पाडा जन्माला आलाय ना मग त्याचं नाव भिकारी ठेवा म्हणजे तो जगेल आणि पुढे-मागे अजून काही पाडेही जन्माला येतील. आजोबांनी पाड्याचं नाव भिकारी ठेवलं. मात्र घरातले सर्व जण त्याला भिक्या नावाने हाक मारायची. त्यानंतर थोड्या वर्षात राणया-भिक्याची जोडी जमली होती. त्याने आमच्या या गोठ्याला चार चांद लागले होते. गोठ्यात गायी असल्यामुळे त्यावेळी दूधदुभता होता. दुधाची चहा आणि गायीचं कच्च दूध बऱ्याचदा आमच्याकडे असायचं. एखादी पाडी झाली की गावभर खरवस वाटला जायचा. काही वर्षांपर्यंत ही परंपरा गावानं जपली होती. कुणाच्या गोठ्यात किंवा वाड्यात वासरू जन्मलं की गावभर खरवस वाटला जायचा. आता माणसांची आणि जनावरांची संख्याही कमी झाल्यामुळे आणि शेती करण्याचं प्रमाणही कमी झाल्यामुळे खळ अर्थात अंगण सारवायला शेणही मिळत नाही, अशी अवस्था आहे. तेथे खरवस मिळणं ही भाग्याची गोष्ट ठरेल.
आयत्री ही गाय म्हणेज आमच्या वाड्याची कुटुंबप्रमुख होती. शिवारात चरायला नेताना आयत्री सर्वात पुढे असायची आणि त्यामागून इतर सर्व गायी. आजोबांनी आयत्री चल हो पुढे, असं म्हटलं की, आयत्री चालायला लागायची. आयत्रीचा रंग काळा, मात्र चंद्रकोर आकाराची शिंगं असल्यामुळे तिचा चेहरा खुललेला दिसायचा.जवळपास 1978 ते 80 च्या दरम्याने आयत्रीसोबत फॅमिली फोटो काढण्यात आला होता. यावेळी आयत्रीने दिलेली पोझही जबरदस्त होती. सर्व कुटुंब पुढे आणि ती मागे. काळाच्या ओघात आज हा फोटो उपलब्ध नाही. नेहमी करुणा जाणवावी असे तिचे डोळे होते. पाणीदार. अशी ही आयत्री आमच्या घराची लक फॅक्टर होती. माझी आईने प्रतिभा घाणेकर हिने सांगितलेली गोष्ट आठवली की, मायमाऊली आयत्रीच्या आठवणीने डोळ्यात टिपूस येतं. मी खूप रडत होतो. माझं रडणं काही थांबत नव्हतं. त्यामुळे आजोबांनी उचललं आणि आयत्रीजवळ नेलं आणि बाजूला उभं केलं. मी आयत्रीच्या पोटाखाली होतो. आजोबांनी मला बाहेर काढेपर्यंत आयत्रीने साधा पायही इकडेतिकडे हलवला नाही. मुक्या जनावरांमध्ये कुठून येतेही एवढी माणुसकी!
आजोबा जेव्हा सकाळी आयत्रीचं दूध काढायला जायचे तेव्हा मलाही घेऊन जायचे. बऱ्याच गायी दूध काढताना लाथा मारतात. मात्र आम्ही तिघं जण तिच्या आचळाला चिकटून असायचो. पण आयत्री तशीच उभी असायची. आयत्रीचं वासरू एका आचळाने दूध प्यायचे. आजोबा दुसऱ्या आचळातून तांब्यात दूध काढायचे आणि दुधाची एक धार माझ्या तोंडात सोडायचे. गरमगरम आणि गोड दूध पिताना अवर्णनीय आनंद व्हायचा.
अशी ही आमची मायाळू आयत्री वाड्यातून बाहेर पडली. वाड्यात गायींची संख्या वाढली म्हणून एकादी गाय विकायचं असं ठरलं. मात्र आयत्रीला विकायचं असं ठरलं नव्हतं. असं सांगितलं जातं की, ज्यांना गाय घ्यायची ते गोठ्यात आले तेव्हा आजोबांनी सहज म्हटलं की जी आवडेल ती गाय घ्या आणि त्यांनी नेमकी आयत्रीलाच निवडलं. नंतर खूप विनंतीही करण्यात आली. पण शब्द दिला असं झालं आणि आयत्री भरल्या गोठ्यातून गेली. सर्वांच्या डोळ्यात पाणी तरारलं. आयत्रीही जायला मागत नव्हती. मात्र शेवटी ती गेली. काही दिवस या मालकाने आयत्रीला सांभाळलं आणि सोडून दिलं. याची माहिती मिळताच आयत्रीला पुन्हा आणायचं ठरलं होतं. मात्र आजोबा आजारी पडले आणि गुरांना सांभाळणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला. एवढ्या गायींना पाळायचं कसं, असाही प्रश्नही निर्माण झाला. मग काही गायींना नातलगांकडे द्यावं असं ठरलं. कारण आयत्रीची माहिती मिळाल्यानंतर गाय ओळखीतल्याच माणसांकडे जाईल तर बरं होईल, असं वाटू लागलं होतं. त्यानुसार मग काही दिवस आयत्री आणि आमचा राणया नावाचा बैल माझी मोठी आत्या मंजुला झिलू तिर्लोटकर यांच्याकडे खडकवली येथे पाठवण्यात आली. त्यांनी या दोन्ही जनावरांची खूप सेवा केली. मध्यंतरीच्या काळात आयत्री कुणाकडेच नव्हती. जेव्हा कुणी सांगायचं आयत्रीला इकडं बघितलं, तिकडं बघितलं. तेव्हा मंजू आक्काला आणि बाबी आक्काला वाईट वाटायचं. मंजुला आणि वत्सला या दोन्ही माझ्या आत्या. त्यांचंही या गायींवर भारी प्रेम. आमच्या गायींना आमचा आणि आम्हाला गायींचा लळाच लागला होता. मात्र आयत्री गेली आणि हळूहळू आमचा वाडा रिकामा होत गेला.
राणया हा आमचा बैल म्हणजे आयत्रीचा नातू. माणसापेक्षा काही अधिक माणुसकी या राणयामध्ये होती. आमची सर्वच जनावरं माणसाळलेली होती. आमच्याकडे गोठ्याला वाडा असाही शब्द वापरतात. तर आमच्या वाड्यात बैल जन्माला येत नसल्यामुळे आयत्रीची मुलगी चकळूला मंजू आत्या घेऊन गेली. यावेळी पाडा झाला तर आम्हाला द्यायचा या अटीवर चकळूला तिर्लोटकर आत्याकडे देण्यात आली. काही दिवसांनी चकळूला पहिला पाडा झाला. आणि त्याचंच नाव राणया. त्याच्या काही अगोदर भिक्या आमच्या वाड्यात जन्मला होता. ठरल्याप्रमाणे राणयाला आमच्याकडे आणण्यात आलं. आजोबा आणि राणया यांचं असंही काही जमायचं की, राणया हा त्यांचा दुसरा नातूच आणि राणयाही आजोबांच्या हाकेला तेवढाचा प्रतिसाद द्यायचा. माणसं ज्याप्रमाणे एकमेकांना सांभाळतात, प्रेम लावतात, मदत करतात तसं आमच्या राणयाचं होतं. तो भिक्याला नेहमीच मदत करायचा. भिक्याला दुसरा कुठला बैल मारायला आला तर मग त्याची काही खैर नसायची. भिक्याला मारणाऱ्या बैलाला राणया असा काही भिडायचा की समोरचा बैल पळूनच गेला पाहिजे.
राणया आणि भिक्याची खरी मजा यायची ती नांगरणीवेळी. छोटा असल्याने भिक्या आतल्या बाजूला असायचा तर राणया बाहेरच्या बाजूला. दोघांच्या पायाला फाल लागू नये यासाठी आजोबा नांगर थोडा सैल आणि लांब बांधायचे. नांगरणी करताना बऱ्याच वेळा 'ही''...ही रे...''ही रे...'' असा आवाज द्यावा लागतो. उंचीने लहान असल्याने भिक्या आतल्या बाजूला असायचा. तसंच भिक्यावर जोखाडाचं वजन जरा जास्त यायचं. त्यातच तो मधे मधे खाली बसायचा. अशा वेळी राणया खूप शांतपणे उभा राहायचा. भिक्या उठेपर्यंत राणया मान खाली वाखवून असायचा. भिक्या उठला की पुन्हा नांगरणी सुरू व्हायची. राणया आयत्रीप्रमाणेच सर्वांचा लाडका होता. राणया आमच्या घरी आला तेव्हा मी तसा लहानच होतो. पण राणयाच्या तोंडावर हात फिरवणं, त्याच्या कोल्यावर हात फिरवणं, मानेखाली हात घालणं सुरू असायचं. राणयाला खाजवणं, शेपटी धरणं, शिंगं पकडणं हे सर्व सुरू असायचं.
तहान लागली की राणया दरवाजात यायचा. पाणी पिऊन झालं की उभा राहायचा. मग आजोबांच्या अंगाला थोडी खाज सुटली की, ते राणयाला हाक मारायचे. मग राणया आजोबांकडे जायचा. आजोबा शर्ट काढायचे आणि त्याच्या समोर बसायचे. आजोबा त्याच्यासमोर पाठमोरे बसले की राणया त्याच्या खरखरीत जिभेने चाटून-पुसून साफ करायचा. अगदी पाठीपासून, हात, तोंड आणि केसापर्यंत सर्व काही स्वच्छ. मग आम्ही मुलंही राणयाच्या पुढ्यात जाऊन बसायचो. घामोळं आलं असेल आणि राणयाच्या समोर जाऊन बसलात तर तुम्हाला जो दिलासा मिळायचा तो आजच्या पावडरनेही मिळणार नाही. अशा या लाडक्या राणयाला आजोबा गेल्यानंतर काही दिवस आजीच्या माहेरी अर्थात हर्चे येथे पाठवण्यात आलं. कारण घरात आता आजी आणि चुलत्यांच्या दोन लहान मुली अश्विनी आणि आरतीच होत्या. हर्चे येथून राणया पुन्हा काही दिवस आमच्या वाड्यात आला. त्यानंतर मंजू आत्याने राणयाला पुन्हा आपल्याकडे अर्थात खडकवलीला नेलं.
राणयाचं झुंजण्याचं कौशल्य अफलातून होतं. राणया अंगाने खूप धष्टपुष्ठ नव्हता, मात्र मोठ्या बैलांना तो झुंजीत पळवून लावायचा. गावच्या बैलांच्या झुंजी या जनावरांना माळरानावर चरायला नेताना होत असतं. गावामध्ये सकाळी 8 वाजले की गुरं सोडायची वेळ व्हायची. मग कुणाच्या गोठ्यातली गुरं पुढे आहेत असा अंदाज घेत काही अंतराअंतराने गुरं सोडली जातं. कातळावर अर्थात सडा भागात गेल्यावर मग गुरं मोकळेपणाने फिरायची आणि चरायची. अशा वेळी कधी कुणाचा बैल धावत यायचा आणि झुंज लागायची. बऱ्याचदा ज्या बैलांच्या झुंजी झालेल्या नसायच्या ते बैल गुरगुरत राहायचे किंवा डुरकाण्या (बैलाची डरकाळी) फोडायचे. एकदा झुंज लागली की पुन्हा कधी तरी झुंज लागायची.. नाही तर मग बैल आपल्या आपल्या वाटेने येत आणि जात. राणयाची सर्वात मोठी गोष्ट ही होती की, तो स्वत:हून कधी कुणाच्या वाटेला जायचा नाही. तो आणि त्याच्याबरोबर असलेली आमच्या गायी हाच त्याचा परिवार. मात्र चुकून एखादा बैल राणयावर धावून आला तर राणया सर्व कसब पणाला लावून त्याला पळवून लावायचा. एखादा बैल मोठा असेल तर समोरासमोर ठक्कर देऊन फायदा होत नसायचा. त्यानंतर राणया खूर घालून, दुसऱ्या बैलाला मधोमध आणून पाडायचा. एकदा का समोरचा बैल पडला की तो पळून जायचा. राणयाने अशा अनेक झुंजी जिंकल्या. आपल्यापेक्षा मोठ्या बैलांना त्याने चितपट केलंय. भिक्याला मारायला येणाऱ्या बैलांनाही राणया पळवून लावायचा. अशी ही राणया-भिक्याची खिल्लारी जोडी होती. मंजू आत्याचा मुलगा विजयने सांगितलं, 'राणयाजवळ माणसाप्रमाणेच माणुसकी होती. आजोबांनी राणयाला जे गुण लावले ते सर्व गुण घेऊन तो जगला. मी आणि श्रीराम लहानच होतो. राणया खाली बसला की आम्ही त्याच्यावर बसायचो. झोपायचो. त्याचाशी खेळायचो. इतर बैलांबरोबर आम्ही असं करत नव्हतो, मात्र राणयाबरोबर चालायचं. असं करताना राणया कधी वर उठला नाही आणि आम्हाला पाडलं नाही. राणया जिभेने आम्हाला चाटूनपुसून साफ करायचा. राणयाकडे झुंजीचं कौशल्य अफलातून होतं. आपल्या परिवारातील कुणाला दुसरा बैल मारत असेल तर आणि समोरचा बैल ऐकत नसेल तर राणया तिथे जायचा. कोणता बैल आपल्या परिवारातला आणि कोणता दुसऱ्या परिवारातला हे त्याला बरोबर कळायचं. राणया झुंजायला गेला मग काय झुंज जिंकली म्हणूनच समजायची, मात्र राणया स्वत:हून कधी कळ काढायचा नाही. जनावरांतला माणुसगुणी बैल म्हणजे राणया असंच म्हणावं लागेल. राणया जनावर असूनही माणसासारखा जगला.''
डॉली ही आमची गाय देखणी, सुरेख होती. आताच्या भाषेत सांगायचं तर सो क्युट. डार्क तांबड्या रंगावर पांढरा रंग तिला फारच शोभून दिसायचा. मधे मधे असलेले पांढरे ठिपके म्हणेज निळ्या आकाशात जशा चांदण्या दिसतात तशा तांबड्या रंगावर ते पांढरे ठिपके चमकायचे. डॉलीचे डोळे खूपच सुंदर आणि डोळस होते. शिंगंही खूप मोठी नव्हती, पण सौंदर्यवतीने मुकुट घालावा अशी नक्की होती. ज्याप्रमाणे सुंदर मुलगी अन्य मुलींमध्ये उठून दिसते तशी डॉली आमच्या इतर गायींमध्ये चमकून दिसायची. या डॉलीला आजीच्या बहिणीला देण्यात आलं. कुसुमलेवाडीत. जेव्हा डॉलीला घेऊन जाण्यासाठी लोक आले तेव्हा तिनं आमचा वाडा सोडायचं नावच घेतलं नाही. जाड दोर बांधूनही ती ऐकत नव्हती. वाड्यातून बाहेर पडल्यावर थोडी पुढे गेल्यावर तिनं बस्कान घातलं. कुसुमलेवाडीपर्यंत नेईपर्यंत नाकीनऊ आले. इतक्या वेळा तिनं थैमान घातलं होतं. बसली की ती जाग्यावरून उठतच नव्हती. कदाचित तिला आमचा वाडा सोडून जायचं नव्हता. त्यावेळी तिच्या डोळ्यात अश्रूही आले असतील. मला पाठवू नका, असं तिच्या पद्धतीने ती सांगतही होती असेल. पण आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कसं तरी करून डॉली कुसुमल्यात गेली. आजीची बहीण असली तरी आम्ही सर्व तिला मावशीच म्हणायचो. मावशी म्हणजे स्वच्छतेचं दुसरं प्रतीक होतं. मावशीकडे गेलेल्या डॉलीला तिच्या मुलांनी लेकीसारखं जपलं. तिची चांगली देखभाल केली.
डॉलीशी स्पर्धा करणारी आमची दुसरी गाय म्हणजे सरिता. डॉलीपेक्षा सरिता दोन-तीन वर्षांनी लहान होती. डॉली तांबड्या रंगामुळे उठून दिसायची तर सरिता सफेद. डोळे, शिंगं आणि पायाचे खूर सोडले तर सरिताने पांढऱ्या बर्फाची चादरच ओढली होती. सरिता गोरीगोमटी होती. तिच्या अंगावर शेणाचा डाग असेल तरी तो ओळखायला यायचा. म्हणजे एकाद्या सुंदर, देखण्या मुलीच्या चेहऱ्यावरचा तीळ जसा उठून दिसतो तसं सरिताचं असायचं. त्या दोघीही तशा स्वच्छ राहायच्या. शिवारात गुरं चारायला नेलं आणि त्यांना शोधायचं असेल तर सरिताला शोधावं. ती दिसली की समाजायचं की आपली गुरं या ठिकाणी चरत आहेत. सरिताही डॉलीसारखीच हट्टी होती. सरिताला आमच्या गावातीलच व्यक्तीनं विकत घेतलं होतं. जे डॉलीनं केलं तेच सरितानं केलं. दोन-तीन वेळा तर ती पुन्हा वाड्यात आली होती. मग समोरचे तिला बांधून शिवारात चारायला नेत असतं. शिवारातही मध्येच आमची जनावरं चरायची त्यात येऊन मिसळायची. सरिताचं म्हणजे नव्या नवरीसारखं झालं होतं. गावातच दिलं तर पाणी भरायला जाता जाता आईच्या घरची चहा पिऊन विहिरीवर जावं असं असायचं. सवय लागेपर्यंत सरिता भारीच माहेरी पळ काढायची. ज्यांनी सरिताला विकत घेतलं होतं त्यांनीही तिचं नाव सरिताच ठेवलं.
सरिताही भिक्याची बहीण. भारती नावाच्या आमच्या गायीला सरिता आणि भिक्या अशी दोन अपत्ये. भारती ही फिकट तांबूस रंगाची होती. भिक्याही तशाच रंगाचा होता. अनेक वर्ष भिक्या हा हडकुळाच होता. मात्र राणयापेक्षा थोटा तापट होता. थोडा आळशी होता, मात्र राणया काम करतोय म्हणजे आपल्याला काम करावं लागणार या भावनेनं तो वागायचा. 1994मध्ये आजोबा गेल्यानंतर जनावरांना सांभाळणं कठीण होतं. भिक्याही आता तगडा झाला होता. तो रस्त्याने चालायचा तेव्हा रस्ता भरलेला वाटायचा. बुटका असल्याने आणखीनच डौलदार वाटायचा. भिक्याने शेतीसाठी राणयासारखी खूप मदत केली. त्यावेळी तो सुकडा होता. 1994मध्ये आलेल्या रोगाने भिक्याचा जीव घेतला. गावात अनेकांची जनावरं गेली. त्यातच भिक्या गेला. जाताना भिक्या सर्वांच्या डोळ्यात आसवं आणून गेला. भिक्याचा मृत्यू हा चटका लावणारा होता. कारण जेव्हा त्याला मृत्यू आला तेव्हा तो रुबाबदार आणि डौलदार दिसत होता.
पवित्रा हे आमच्या आणखी एका गायीचं नाव. ही आयत्रीची नात आणि टिकळू नावाच्या गायीची पाडी. (मुलगी) ही पवित्रा नावाप्रमाणे कोणत्याही क्षणी कोणता पवित्रा घेईल याचा नेम नसायचा. घरी येताना पाणी पिण्यासाठी विहिरीवर पाणी प्यायला नेलं जायचं. विहिरीवर डोण होती. दगडात कोरलेली. आजही आहे, मात्र रस्त्याच्या कामामुळे ती मातीखाली गेलीय. खरं म्हणजे ती खोदून बाहेर काढल्यास आजही फायद्याची ठरेल. पवित्रा या डोणीवर न जाता ती मधूनच पळ काढायची. मग तिला आणयाला दुसऱ्या माणसाला जावं लागायचं. तिचं हे वागणं माहिती पडल्यानंतर पाण्यावर नेताना गुराखी तिच्या बरोबरच असायचा. पवित्रा इकडेतिकडे बघायली लागली आधीच दम द्यायला लागायचा. काही गायींचा मृत्यू वाड्यातच झाला त्यात भारती आणि टिकळू या दोन गायींचा समावेश आहे. टिकळू गाय ही हकनाक गेली. गावातील एका माणसाच्या मुलाच्या जन्माची वेळ चुकली आणि भटानं दान द्यायला सांगितलं. त्यासाठी काही तरी विधी केला जातो आणि त्याचं जेवण एखाद्या जनावराला अर्थात गायीला दिलं जातं. हे जेवण टिकळू या गायीला दिलं गेलं, अर्थात ही गोष्ट आमच्या घरातल्यांना माहिती नव्हती, गाय गोठ्यात बांधलेली असताना ते पान तिच्या पुढ्यात ठेवण्यात आलं. तीन दिवसानंतर टिकळू गेली. अचानक गायीचा मृत्यू झाल्याने आजीने चौकशी केली. त्यावेळी काही लोकांनी ही घटना सांगितली. (यातील श्रद्धा-अंधश्रेद्धेचा भाग वेगळा). आमच्या वाड्यातून भिकारी गेला आणि वाडा आमचा पोरखा झाला. 1996 पासून वाड्यात गायींचा सहवास नाही, मात्र आमच्या गायींनी आणि बैलांनी जे प्रेम दिलं, जो सहवास दिला त्याचा सुगंध शेवटपर्यंत दरवळत राहणारा असाच आहे. आमच्या वाड्यातील जनावरांमधील माणुसकी ही 'राजेशाही'प्रमाणे होती आणि ती खूप काही शिकवून जाणारी ठरली.
0 Comments