Header Ads Widget

'कडक' शिस्तीतील 'कोमल' व्यक्तिमत्व : पुंडपाळ सर


'कडक' शिस्तीतील 'कोमल' व्यक्तिमत्व : पुंडपाळ सर

श्री महाकाली इंग्लिश स्कूल आडिवरे आणि  श्री. पुंडपाळ सर हे एक अविस्मरणीय समीकरण आहे तसे पुंडपाळ सर आणि  त्यांचे  विद्यार्थी यांच्यात एक अवीट नाते आहे... आणि  हे नाते त्याच्या हातचा मार खाणारे आणि  न खाणारे विद्यार्थीही कबूल करतील. आजही सरांचे नाव कुणी उच्चारले तरी शाळेची आठवण येते आणि शाळेचे नाव घेतले की सर आठवतात. अनेक  विद्यार्थांचे ते आयडॉल आहेत. सर, त्यांचे विद्यार्थी आणि आडिवरे त्यांचा एक ऋणानुबंध आहे. ही ऋणानुबंधाची भेट अशीच राहावी अतुट, विजोड...

सर जवळ होते तेव्हा आम्ही दूर राहिलो आणि  ते आता दूर आहेत तर आम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. असं असलं तरी सर सर्व विद्यार्थ्यांच्या मनात घर करून आहेत. शाळेत असताना सरांशी जवळीक झाली नाही. त्याला काही कारणे आहेत, त्यातील पहिले कारण म्हणजे आमच्या पुढच्या बॅचने सरांविषयी निर्माण केलेली भीती. पुंडपाळ सर कडक आहेत. ते मारतात. त्यांना वेळच्या वेळी अभ्यास पूर्ण हवा. वर्गात बोललेले चालत नाही. आशा अनेक गोष्टी कानावर पडायच्या. आठवीपासून सर इंग्लिश शिकवायचे. इंग्लिश तास तर रोजच असायचा. पण पुंडपाळ सर असे एकमेव शिक्षक होते की त्यांचा इंग्रजीचा तास सुरु होण्यापूर्वी सर्वांच्या वह्या आणि पुस्तके बँचवर उघडलेली असायची. अन्य कोणत्याही विषयाची पुस्तके, वह्या त्या त्या विषयाचे शिक्षक आल्याशिवाय कुणीही उघडायचे नाहीत. सर आल्यावर वर्गात शांतता. मग सरांचा तास सुरू होई. जर सोमवार असेल तर day befour yesterday आणि दुसरा दिवस असेल तेव्हा yesterday we swa...या शब्दांनी तासाची सुरुवात व्हायची. हे शब्द त्यांचा कोणताही विद्यार्थी कधीही विसरणार नाहीत. खणखणीत आणि स्पष्ट उच्चार...विद्यार्थ्यावरील बारीक लक्ष, विद्यार्थ्यांप्रती प्रेम ही त्यांची काही ठळक वैशिष्ट्ये.

इंग्रजीचे मास्टर म्हटल्यावर बाकीचे काही प्रश्न नाहीत. त्यांची इंग्रजी शिकवण्याची पद्धत वेगळी होती. ती त्यावेळी आम्हाला नाही कळली, मात्र त्यांची विद्यार्थ्यांप्रती शिकवण्याची धडपड अधिक होती. तळमळ होती आणि आत्मीयताही होती. त्यावेळी उत्तरे पाठ करायची आणि लिहायची. मुलांना व्याकरण समजावे, दहावीतल्या मुलांना व्याकरणातून कसे मार्क्स मिळवता येतात हे ते छानच सांगायचे. त्यासाठी त्यांनी त्यावेळी पुस्तिका काढली होती. ती इतकी उपयुक्त होती की 35 पैकी 30 मार्क्स हमखास मिळायचे.वर्गात कानाखाली प्रसाद मिळू नये म्हणून दोन विद्यार्थ्यांच्या मधे विद्यार्थी बसायचे... तरी चूक झाल्यास पाठीवर धपाटा पडायचा. शिकवताना दोन विद्यार्थी बोलले की शिक्षा करण्याची पद्धत अनोखी होती. दोघांनाही ते पुढे बोलवायचे आणि एकाशी बोलताना दुसऱ्याच्या कानाखाली आवाज यायचा... त्यावेळी वाईट वाटायचे, पण आता या आठवणी जागा झाल्या की गालातल्या गालात हसू येते आणि हेच हसू सरांच्या प्रेमाखातर... माझ्या मुलांचे इंग्लिश चांगले व्हावे ही त्यांची त्यामागची सरांची प्रामाणिक इच्छा. 

सरांविषयी अनेकांच्या अनेक आठवणी असतील. माझ्या आहेत. सर एकदा आजारी होते. अनेक दिवस शाळेत आले नव्हते. मग आमच्या पुढच्या वर्गातले काही विद्यार्थी त्यांची विचारपूस करून येत. आमच्या मनात उगाच भीती...मग दहा ते बारा जणांनी सरांना भेटायला जायचे ठरले. भीत भीत का  होईना आम्ही सरांच्या घरी दुपारच्या सुट्टीत पोहोचलो.

सरांना कसे विचारणार... सर्व शांत.... मग सरच म्हणाले, अरे तुम्ही आलात, बरे वाटले.. बसा.... असे सर म्हणाले.. तेव्हा कुठे त्यांच्याशीही बोलायचा धीर चेपला. मग विचारपूस करून आम्ही शाळेत निघालो...त्यावेळी त्यांनी आम्हाला शेंगदाणेही खायला दिले होते. अशीच एक आठवण म्हणजे आमचा 12वीचा इंग्लिश पेपर. आडिवरे हायस्कूलमधे 11-12वीचे वर्ग सुरु झाले होते. त्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी बनण्याचा मान मिळाला. 12वीचे सेंटर होते राजापूर हायस्कूल... इंग्लिशचा पेपर कठीण गेला होता. पेपरच्या शेवटच्या दिवशी सर राजापूरला आले होते. आता सर काहीतरी बोलतील किंवा सरांना कसे सांगणार की पेपर थोडा कठीण गेला म्हणून... मनात भीती....मी आणि माझा मित्र राजन पावणाक राजापूर डेपोमध्ये आलो. जवाहर चौकात... तर सर आणि वर्गातले इतर मित्र, मैत्रिणी आधीच पोहोचले होते. पण सरांसमोर जाताना आम्ही हसत हसत गेलो.... सर काय बोलतील की काय या विचारात असतानाच सर म्हणाले, तुम्ही हसत आलात हिच मोठी गोष्ट आहे. सरांच्या या एका वाक्याने डोक्यावर आकाशाएवढे असलेले ओझे कुठे नाहीसे झाले ते समजले नाही. एका वाक्याने त्यावेळी सरांच्या अगदी जवळ गेल्याचे खुप समाधान वाटले.सरांचे नाते जसे विद्यार्थ्यांशी आहे त्यापॆक्षा वेगळे नाते शाळेशी आहे. श्री महाकाली इंग्लिश हायस्कूल घडवण्यात अनेकांचा मोलाचा वाटा आहे. त्यात पुंडपाळ सरांचे नाव आवर्जून घेतले पाहिजे. शाळेला विद्यार्थी मिळावेत यासाठी ते गावोगावी फिरले आहेत. त्यावेळी आतासारखे रस्ते नव्हते. पायवाट तुडवत, चिखलातून ते अगदी भालावलीसारख्या, त्याहून लांब गावात जात असत. इतकंच कशाला, शाळेला मोठे मैदान आहे. आता वर्ग वाढवल्याने आकुंचन पावले आहे. या मैदानात आणि मैदानाच्या शेजारी जी सुरुची झाडे, अशोकाची झाडे, निलगिरीची झाडे दिसतात ती त्यांनी लावली आहेत. या सुरुच्या झाडांमुळे शाळेची शान आहे. वारा शीळ कसा घालतो हे अनुभवायला यायचे ते या झाडांमुळे...रविवारी तर याचा अनुभव चांगला घ्यायला यायचा. शाळेवर जीवापाड प्रेम करणे म्हणजे नेमके काय असते ते सरांच्या या कृतीतून दिसून येते. 90च्या दशकात पावसात वादळ आले होते. त्यात शाळेच्या एका वर्गाची कौले उडाली होती. ती कौले पुन्हा घालण्यासाठी सर्व शिक्षक एकत्र आले होते. पुंडपाळ सर डोक्यावर रुमाल बांधून छतावर चढले होते. शाळेचे प्रेम सर्वांना असते, प्रत्येक्षात उतरवणे मात्र सोपे नसते. पण सरांचे शाळा, विद्यार्थी यांच्यावरचे प्रेम अतुट, अमोल आहे आणि आजही त्यांनी ते जपले आहे.

सरांचे कुटुंबही तेवढेच प्रेमळ आहे. याचा अनुभव गेल्या वर्षी आला. सर परळला आले होते. मी, रुकेश दळवी आणि प्रतीप घाणेकर त्यांना भेटायला गेलो होतो. मला त्यांच्या भावांकडे त्यांची पुस्तकं आणायची होती. मी घरातून लवकरच निघालो. कांदिवलीला जाऊन मला परळ येथे जायचे होते. माझ्या स्वभावाप्रमाणे मला 5 मिनिटात सरांच्या भावांच्या घरातून निघता आले असते. मी तोच हिशेब लावला होता. पुस्तकं घ्यायची आणि ताबडतोब निघायचे... पण कसले काय... सरांचे भाऊ, पुतण्या सरांसारखे प्रेमळ.. मग तेथे अर्धा तास कसा गेला ते कळलेच नाही. चहा, नाश्ता आणि आठवणी... मग आम्ही तिघे भरपावसात सरांना भेटायला गेलो. मुंबईची परिस्थिती पाहता आणि जास्त पाऊस पडत असल्यामुळे सरांचा फोन यायचा, अरे काळजी घ्या. पाऊस पडत आहे. नंतर या...त्यात त्यांना काळजी वाटायची..पण आम्ही गेलोच भिजत...मग काय...ज्या काही आठवणी निघाल्या त्या भारीच होत्या..सरांच्या घरातून पाय निघता निघत नव्हता..

सरांची अजून एक आठवण... त्यांच्या कपड्यांची इस्त्री एकदम कडक... चालायची विशिष्ट अशी चाल... पण त्यांची चालायची स्टाईल जास्त आवडायची ती पावसाळ्यात... बरेचदा आम्ही त्यांच्या पाठीमागून चालत असू...हा तर पावसात ते चालताना छत्री अशा काही पद्धतीने टेकवत चालायचे की ते ऱ्हिदमिक वाटायचं...इतकी त्यांची ती लयबद्ध चाल असायची... बऱ्याचदा आम्ही मुलं ही चाल कॉपी करायचा प्रयत्न करायचो पण छत्री आणि आम्ही आणि चाल यांची काय लय लागायची नाही... छत्रीच जमिनीवर जास्त आपटायची...

सरांविषयी कितीही लिहिले तरी कमी आहे... आता सर सुंदर कविता लिहितात,  अनेकजण वाचतात... कडक शिस्तीचे सर कवीमनाचे, प्रेमळ मनाचे होते...हे समजायला उशीर झाला... सर तुमचे आशीर्वाद सर्व विद्यार्थ्यांवर आहेतच, पण माझ्यावर जरा जास्त असू द्या...

गुरुपौर्णिमेनिमित्त मला घडवणाऱ्या सर्व गुरूंना, आडिवरे हायस्कूलच्या सर्व शिक्षकांना मनापासून वंदन !

banner

Post a Comment

0 Comments