वामन शेवडे सर : इतिहास जिवंत करणारे सर
पाचएक फूट उंच, गोरा वर्ण, गोल चेहरा आणि गोलसर नाक, तुरु तुरु चाल आणि भिरभिरती नजर...अशा या शेवडे सरांना शिकवण्यासाठी कोणताही विषय व्यर्ज नव्हता. उत्तम प्रकारे विषय समजून शिकवायचा त्यांचा हातखंडा.
माझ्यासाठी शेवडे सरांची पहिली भेट झाली ती इयत्ता सहावीत. भाकरवाडीमध्ये असलेल्या वेलणकर यांच्या माडीवर तेव्हा पाचवी आणि सहावीचे वर्ग भरायचे. सहावीला ते इंग्लिश शिकवायचे. आजही त्यांनी शिकवलेला टोपीवाला आणि माकड हा धडा तसेच सोलोमन ही कविता अनेकांच्या लक्षात असेल. सातवीला कधी तरी इंग्लिश शिकवायला यायचे.
दहावीला ते इतिहास हा विषय शिकवायचे. इतिहास हा विषय त्यांच्या अंगात इतका भिनला होता की इतिहासातील काहीही केव्हाही विचारा सरांकडे उत्तर तयार असायचे. शेवडे सरांचे विशेष म्हणजे ते वर्गात येतात कधीही पुस्तक आणायचे नाहीत. पुस्तकात न पाहत इतिहास अचूक शिकवण्यात ते पारंगत होते. त्यांनी दहावीला पाहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध इतके सुंदर शिकवले की दहावीचा इतिहास पेपर लिहूनही काही वर्षे सनावल्या लक्षात राहिल्या.
शेवडे सर तसे शिस्तीचे. वर्गात शिकवत असताना सर्व विद्यार्थ्यांवर त्यांची भिरभिरती नजर असायची. कुणी चुळबूळ केली की थेट हाकच यायची, घाणेकर आणि त्याकडे दुर्लक्ष केले की मग फटके पडायचे. तसे ते प्रेमळही होते. अभ्यास चांगला झाला की आपुलकीने चांगला अभ्यास केलास अशी शाबासकीही द्यायचे.
शेवडे सरांना आणखी एक सवय होती ती म्हणजे आडनावाने हाक मारायची. घाणेकरा, दळवी, आडिवरेकर..अशीही आठवण त्यांचा विद्यार्थी प्रतीप घाणेकर याने सांगितली. इतकंच नव्हे तर शेवडे सर आजही तितक्याच तन्मयतेने विद्यार्थ्यांची विचारपूस करतात असे प्रतीप याने सांगितले.
शेवडे सरांची काही वाक्य फेमस होती. त्यातील एक वाक्य म्हणजे मला चुकीचं पटकन दिसतं आणि ते खरंच आहे. उत्तरात चूक असली की त्यांच्या नजरेत कशी यायची हे कळायचे नाही. अधिक इतिहास हा सर्वांच्या आवडीचा विषय आणि आवडते सर इतिहास शिकवत असल्यामुळे जो जिवंतपणा यायचा त्याला तोड नसायची. दहावीत ते इतके तन्मयतेने शिकवायचे की विद्यार्थी शिकवलेले विसरणं अशक्य असायचे.
सर शिक्षणशास्त्र हा विषयही तितक्याच पोटतिडकीने शिकवायचे. ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांनी शिक्षणशास्त्र विषय चांगला अभ्यासला पाहिजे असा त्यांचा अट्टहास असायचा.
सर भाकरवाडीच्या मळ्यातून चालत यायचे. सर दिसले की 'मेल्यानू, गप रव्हा, सर येतैत' असे विद्यार्थी म्हणत असत, अशी आठवण त्यांचा आणखी एक विद्यार्थी रुकेश दळवी याने सांगितली. आडिवरे शाळेतील सर्वच शिक्षकांची आदरयुक्त भीती वाटणे हे त्यांच्यात भिनलेल्या शिस्तीचा महत्त्वाचं आणि अविभाज्य अंग आहे.
माझा विद्यार्थी हा चांगलाच घडला पाहिजे असा आडिवरे हायस्कूलच्या ज्या शिक्षकांचा होरा असायचा त्यात शेवडे सरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, एवढे निश्चित आहे. अशा या शेवडे सरांना आमचे विद्यार्थ्यांचे कोटी कोटी प्रणाम।
0 Comments