![]() |
| एक संसार उद्ध्वस्त झाला... मुलांचे हात धरून निघून गेलेला अमोल आणि मागे उरलेला फक्त पश्चात्ताप! |
तो प्रियकर 'ती'चा होता
बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. खिडकीवर पडणाऱ्या थेंबांचा एक लयबद्ध आवाज येत होता. पण समीराचं लक्ष बाहेरच्या निसर्गाकडे नव्हतंच. ती गॅलरीतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर मोबाईलच्या स्क्रीनचा निळसर प्रकाश पडला होता. तिची बोटे स्क्रीनवर वेगाने चालत होती. चेहऱ्यावर कधी हसू, तर कधी काळजीच्या रेषा उमटत होत्या. मनात भावनांचं काहूर माजलं होतं, पण बाहेर मात्र ती शांत दिसण्याचा प्रयत्न करत होती.
"समीरा... मुलांची बॅग भरलीस का? शाळेला उशीर होईल..." अमोलचा आवाज स्वयंपाकघरातून आला. अमोल सकाळी उठून मुलांचा डबा भरत होता.
समीराने ऐकलं, पण उत्तर दिलं नाही. तिनं मोबाईल स्क्रीनवर आलेला नवीन मेसेज वाचण्यात ती गुंतली होती. 'तो' काहीतरी लिहीत होता आणि त्या एका मेसेजसाठी तिचं जग थांबलं होतं.
दिवसभराचं काम आटपून समीरा दुपारी थोडी विसावली होती. मोबाईल हाताळताना अचानक तिला एक नोटिफिकेशन दिसलं. 'Aditya send you a friend request'. तिच्या काळजाचा ठोका चुकला. आदित्य! तिच्या शाळेतलं पहिलं प्रेम. दहावीच्या वर्गातल्या त्या निरागस आठवणी. बाकावर चोरून बघणं, शाळेच्या मागच्या कट्ट्यावर केलेली भविष्याची स्वप्नं... सर्व काही डोळ्यांसमोर झपकण येऊन गेलं.
वडिलांच्या धाकामुळे आणि परिस्थितीमुळे त्यांचं प्रेम अधुरं राहिलं होतं. 'आपलं काहीच नाही राहिलं...' असं म्हणत ती रडत रडत वेगळी झाली होती आणि अमोलसोबतच्या नव्या आयुष्यात रुळली होती. अमोल चांगला होता. जबाबदार होता. त्याने तिला सुख दिलं होतं, पण तिच्या मनाच्या कोपऱ्यात आदित्यसाठी असलेली ती रिकामी जागा तशीच होती.
तिने थरथरत्या हाताने 'Accept' बटण दाबलं आणि तिथूनच एका नव्या, वादळी अध्यायाला सुरुवात झाली.
सुरुवातीला फक्त 'कशी आहेस?', 'काय चाललंय?' असे साधे मेसेज होते. मात्र हळूहळू संभाषणाचा ओघ बदलला. जुन्या आठवणी उजळल्या गेल्या. त्यांच्यातले अबोल प्रेम शब्दांत उतरू लागलं.
आदित्य: "कशी आहेस?"
समीरा: "ठीक आहे... तू?"
आदित्य: "तुझ्याशिवाय... ठीक नाही. अजूनही तू तशीच आठवतेस, शाळेतल्या युनिफॉर्ममधली."
समीराच्या मनात कालवाकालव झाली. तिला कुणीतरी इतक्या वर्षांनी 'special' फील करून देत होतं. अमोल सोबतचा संसार रुटीन झाला होता. त्यात प्रेम होतं, पण उत्कटता नव्हती. आदित्यच्या मेसेजने ती उत्कटता पुन्हा जागी केली.
हळूहळू चॅटिंग वाढलं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत समीराचा हात मोबाईललाच चिकटलेला असे. स्वयंपाक करताना, जेवताना, अगदी मुलांशी बोलताना, पतीशी बोलतानाही तिचं लक्ष मोबाईलच्या नोटिफिकेशनकडे असे.
चॅटिंगच्या या नादात घराकडे तिचे दुर्लक्ष होऊ लागलं. पूर्वी ती मुलांचा अभ्यास घ्यायची, त्यांच्याशी खेळायची, पण आता तिला वेळच मिळत नव्हता. अमोल घरी आला तरी तिचं लक्ष नसायचं. मुले काही विचारला आली की ती चिडायची. नवरा काय बोलला तरीही खेकसायला लागली. तिच्या रोजच्या बोलण्याचा आवाजात, संवादातला प्रेमळ भाव संपला होता. चिडचिड्या आवाजात समीरा बोलायची. ती आता तिचा मोबाईल अमोलच्या हातीही देत नव्हती. माझ्या मोबाईलला हात लावायचा नाही, अशी बोलायची. रात्रीही मोबाईल उशाखाली घेऊन झोपायची. दिवसेंदिवस समीरा बदलत होती.
एके दिवशी "आई, माझा गृहपाठ बघ ना," तिचा धाकटा मुलगा सोहम वही घेऊन आला.
समीरा मोबाईलमध्ये बघतच म्हणाली, "जा, बाबांना विचार. मला काम आहे."
तिच्या आवाजातला कोरडेपणा मुलाला जाणवला. तो बिचारा गप्पपणे निघून गेला.
घरातली कामं प्रलंबित राहू लागली. धूळ साचली, कपड्यांचे ढीग साचले. अमोलला हे सर्व जाणवत होतं. तो सुरुवातीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता, पण आता त्यालाही त्रास होऊ लागला होता.
"समीरा, घराकडे थोडं लक्ष दे ना. मुलं लहान आहेत, त्यांना तुझी गरज आहे," अमोलनं एकदा प्रेमानं सांगितलं.
पण समीरा चिडली, "मी दिवसभर काम करते, मला थोडा वेळ मोबाईल बघायचा अधिकार नाही का? तुम्हीच बघा ना मुलांकडे. घराची साफसफाईही मीच का करावी, तुम्हीच करा."
तिच्या या उत्तराने अमोल शांत व्हायचा, पण त्यांच्यातील दुरावा वाढतच गेला. पूर्वी त्यांच्यात असलेली प्रेमभावना, विश्वास आता धूसर होत चालला होता. घरात आनंदाऐवजी तणावाचं वातावरण राहू लागलं. अमोल आणि समीरामधला अबोला वाढत होता. रात्रीही अमोल वेगळ्या बेडवर झोपू लागला.
अमोलला आता खात्री पटली होती की काहीतरी नक्कीच बदललं आहे. समीरा पूर्वीसारखी राहिली नव्हती. ती तिच्याच विश्वात हरवलेली असायची. एकदा तिने मोबाईल टेबलवर ठेवला असताना त्यावर मेसेज आला. अमोलने सहज बघितलं, 'Aditya'. त्याचे काळीज धडधडलं.
त्या रात्री अमोल झोपला नाही. तो विचार करत होता, 'मी काय कमी केले? मी तर तिच्यावर खूप प्रेम केलं, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली.' त्याच्या डोळ्यात अश्रू आले. मुले झोपलेली होती, त्यांच्याकडे बघून त्याला आणखीनच वाईट वाटलं.
एकदा तर समीरा अमोलला जोरातच बोलली, 'काय केलं माझ्यासाठी. कधी माझ्या आवडीची साडी आणलीत का ? कधी मला कुठे फिरायला नेलं का? कधी हॉटेलमध्ये जेवायला नेलं का? अमोल तुझ्यासोबत कधीच सुखानं जगता आलं नाही. साध घरही घेता आलं नाही तुला...किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं...किती दिवस भाड्याची घरं बदलायची. सुख म्हणून तू मला काय दिलंस?' समीराच्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे अमोल काहीच बोलला नाही.
दुसरीकडे, समीराच्या मनातही द्वंद्व सुरू होतं. तिला माहीत होते की ती चुकीचं करत आहे. ती अमोलला फसवत होती, मुलांकडे दुर्लक्ष करत होती. पण आदित्यसोबतचे चॅटिंग तिला एक वेगळाच आनंद देत होतं. तो आनंद तिला सोडवत नव्हता. समीरा आता अमोलचा डबाही भरून देत नव्हती. रात्री घरी आला तर पाणीही देत नव्हती. इतकंच नव्हे तर जेवायलाही वाढत नव्हती. अमोलने जेवायला वाढ असं म्हटली तरी ती तुम्ही जेवण घ्या अशी जोरातच खेकसून सांगत होती. लग्नानंतर रोज फोन करणारी समीरा आता अमोलला कुठे आलास, असा फोनही करत नव्हती. अमोल आता तिच्या जगात नव्हे तर हृदयातही नव्हता.
कशी आहेस पासून सुरू झालेले मेसेज आता तू माझी कधी होणार इथपर्यंत पोहचले होते. आदित्य समीराला मेसेज करताना अनेक अभिनेत्रींची उपमा देऊ लागला होता. एकदा समीरा अंघोळीला गेली होती. त्याच वेळी आदित्यचा मेसेज समीराच्या मोबाईल स्क्रीनवर झळकला. अमोलने सहज व्हॉट्सअॅप मेसेज पाहिला. आदित्यने लिहिलं होतं.
'तू माझी करिना आहेस. तू करिनासारखी दिसतेस'. अमोलने मेसेज वाचताच त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने मेसेज स्क्रोल करायला सुरुवात केली.
गुडमॉर्निंग डिअर, चहा प्यायलीस का? नाश्ट्याला काय केलंस? फिरायला केव्हा जायचं? आज ड्रेस कुठला घातला आहेस? अमोल कामावर गेला का? फोन केव्हा करू?... अमोलच्या प्रत्येक मेसेजला समीराने उत्तर दिलं होतं, तेही स्मायली लावून. असे अनेक मेसेज वाचून अमोलच्या पायाखालची जमीनच सरकली.
एक एक दिवस पुढे सरकत होते. समीरा आणि अमोलमधील दरी वाढत होती. अमोलची जागा आदित्यने घेतली होती.
एक दिवस अमोलने धाडस करून समीराला विचारलं, "समीरा, खरं सांग, काय चाललंय? तू मोबाईलमध्ये कुणाशी बोलत असतेस?"
समीरा क्षणभर घाबरली, पण नंतर तिने ठरवले की आता लपवण्यात काही अर्थ नाही. "अमोल... मला... मला कुणीतरी आवडायला लागलंय..."
अमोलच्या पायाखालची जमीन पुन्हा सरकली. "कोण?"
"आदित्य... शाळेतला..."
भयानक शांतता पसरली. अमोलला वाटलं की त्याचे संपूर्ण विश्व कोसळून पडलं आहे. त्याने तिच्यावर विश्वास ठेवला होता, आणि तिने त्या विश्वासाचा घात केला होता.
काही दिवसांनंतर, समीराने निर्णय घेतला. तिला आदित्यसोबत जायचं होतं. तिने आपली बॅग भरली. मुलांकडे बघून तिला खूप वाईट वाटलं, पण तिचं मन आदित्यकडेच ओढलं जात होतं.
बाहेर सूर्यप्रकाश पडला होता. अमोल दोन मुलांना घेऊन घराबाहेर पडला. तो पाठमोरा होता. त्याच्या एका हातात सोहम आणि दुसऱ्या हातात सोनाली होती. त्याच्या पाठीवर काळे ढग जमा झाले होते, जे त्याच्या आयुष्यातल्या अंधाराचे प्रतीक होते.
समीरा आणि आदित्य बागेत उभे होते. आदित्यने समीराचा हात धरला होता.
अमोलने जाता जाता मागे वळून न बघता मनात विचार केला, "प्रेम जिंकलं... पण कुणाचं? तिचं की माझं? मी तर तिच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं."
समीराच्या मनातही एक प्रश्न आला, "मी खरंच जिंकलेय? की मी माझं घर, मुलं, नवरा... सर्व काही हरवलंय? हे प्रेम खरंच शाश्वत आहे का?" मात्र समीरा थांबली नाही. तिने आदित्यचा हात घरला आणि पहिलं प्रेम भेटलं या आनंदाने चालू लागली. आदित्य आणि समीराच्या पाठमोऱ्या आकृतींकडे पाहताना अमोलच्या डोळ्यात पाणी तरारलं. आपलं प्रेम कमी पडलं. श्रीमंती कमी पडली. अमोलने सोहम आणि सोनालीचा हात घट्ट पकडला...एक संसार उद्ध्वस्त झाला... त्याच्यावर एकच वाक्य अमोलच्या तोंडी आलं...तो प्रियकर तिचा होता...
कथा आवडली तर नक्की लाईक करा, कथांबरी ब्लॉगला फॉलो करा. धन्यवाद

0 Comments